राजुरा तालुक्यात ८१ गावांत विलगीकरण कक्षच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:28 AM2021-05-18T04:28:35+5:302021-05-18T04:28:35+5:30
बी. यू. बोर्डेवार राजुरा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. अनेक कोरोनाबाधितांचा ...
बी. यू. बोर्डेवार
राजुरा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूचा आलेख वाढत चालला आहे. अनेक कोरोनाबाधितांचा बेड व प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. मुळात रुग्णसंख्या वाढीला 'ब्रेक' लावण्यासाठी ग्राम स्तरावर विलगीकरण कक्षाची गरज असते; पण याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाबाधितांना मोकळे रान मिळत आहे. गावात 'मोकाट' फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. राजुरा तालुक्यात अजूनही ८१ गावांत विलगीकरण कक्षाची सोय नाही.
परिणामी पॉझिटिव्ह रुग्णांचा बेजबाबदारपणा संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात चांगलाच हाहाकार माजविला आहे. कोरोनाची पहिली लाट शहरापुरती मर्यादित होती. त्यामुळे ग्रामीण जनता बिनधास्त होती; पण दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याने जनतेत भीतीने घर निर्माण केले आहे. त्यातच काही गावांतील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या काही गावांत तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांत कोरोना चाचणी केली जात आहे. यात बहुतेक तापाचे रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे; पण या कोरोनाबाधितांची कुठे व्यवस्था करायची, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात ६५ ग्रामपंचायती असून, यात १११ गावांचा समावेश आहे; पण मोजक्याच गावांत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. आजघडीला ३० गावांमध्ये कक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे आणि या केंद्रात गावातील कोरोना रुग्ण राहत आहेत; पण उर्वरित ८१ गावांत विलगीकरण कक्ष नसल्याने या गाव परिसरातील रुग्ण हे घरी आयसोलेट होऊन गावात मोकाट फिरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना मोकळे रान मिळत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांच्या मोकाट फिरण्यामुळे गावात संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन गावात पर्यायी व्यवस्था तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.