तंमुसच्या निवडीवरून ग्रामसभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:38+5:302021-09-18T04:30:38+5:30
वरोरा : तालुक्यातील मोठी समजली जाणारी टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तंटामुक्त समिती अध्यक्षपद ...
वरोरा : तालुक्यातील मोठी समजली जाणारी टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तंटामुक्त समिती अध्यक्षपद निवडीचा विषय आल्यानंतर तत्काळ आक्षेप घेण्यात आला नाही. निवडीची घोषणा झाल्यानंतर काही नागरिकांनी आक्षेप घेतला. यावरून ग्रामसभेत चांगलाच गदारोळ झाला. पोलीस पोहोचताच गदारोळ शांत होऊन पुढील विषयाकरिता ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली.
टेमुर्डा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत शासकीय योजनांची माहिती, रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या कामाची निवड करणे, शबरी आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करणे, रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड, पाणीपुरवठा समिती निवड, जैविक विविधता समिती निवड, अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय ठेवण्यात आले होते. तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड हा विषय येण्यापूर्वी सर्व विषय मंजूर करण्यात आले. त्यानंतर तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड हा विषय आला. त्यावेळी छगन चौगुले यांचे नाव सभेपुढे आले. त्यानंतर काही वेळाने या नावावर कुणाचा आक्षेप आहे का याबाबत विचारणा करण्यात आली त्यावर कोणीही आक्षेप घेतला नसल्याने तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यानंतर काही वेळाने तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीला आक्षेप घेण्यात आला. त्यावरून सभेत गदारोळ होऊन धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. या सभेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. गदारोळ वाढत असल्याने वरोरा पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचतात गदारोळ शांत झाला. याबाबत पोलिसात कुणीही तक्रार केली नाही. सभेतील उर्वरित विषय पुढील ग्रामसभेत ठेवले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सचिव नरेश धवने यांनी दिली.