दारूबंदी झाली; मात्र व्यसनाधीनता वाढली
By admin | Published: February 11, 2017 12:36 AM2017-02-11T00:36:48+5:302017-02-11T00:36:48+5:30
ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे ...
तरुणाई व्यसनाच्या विळख्यात : सुगंधित तंबाखूवरील बंदी गेली कुठे ?
चंद्रपूर : ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वीच जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. मात्र व्यसनाधिनता कमी झाली नाही. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही वाट्टेल तिथे हा तंबाखू विकला जात आहे. दारूला पर्याय म्हणून ड्रग्स, ब्राऊन शूगरचा विळखा जिल्ह्यात पडत चालला आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या सात लाखांच्या घरात पोहचली आहे. यातील बहुतांश लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब अशी की यातील महिलांची संख्याही वाढत आहे. चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात दोन हजारांच्या जवळपास पानटपऱ्या आहेत. यातून नियमित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. याशिवाय किराणा दुकानामधूनही हे पदार्थ विकले जातात, अशी माहिती आहे.
उल्लेखनीय म्हणजे, अगदी १३ वर्षांचे मिसरुड आलेले, न आलेले मुलेही या व्यसनात आकंठ गुरफटले आहेत. चॉकलेट, बिस्कीट व फळे खायच्या वयात ही मुले चक्क खर्रा चघळताना दिसतात. विशेष म्हणजे, शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे. पोलीस व अन्न-औषध प्रशासन विभागाला कारवाई अधिकारी दिले आहे. असे असले तरी सुगंधित तंबाखू व त्याचे खर्रे सर्रास विकले जात आहे. तक्रार आलीच की एखाददुसरी कारवाई केली जाते. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण जैसे थेच आहे. (शहरण प्रतिनिधी)
आरोग्य धोकादायक वळणावर
आधीच औद्योगिकरणामुळे चंद्रपूरचे प्रदूषण देशाच्या पातळीवर पोहोचले आहे. प्रदूषणाचा सरळसरळ परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. आता तरुणांपासून वयोवृध्द व महिलांपर्र्यत तंबाखूजन्य पदार्थाचा विळखा पोहचल्याने नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे.
ब्राऊन शुगरबाबत आताच गंभीर व्हावे
जिल्ह्यात दारू बंद झाल्यापासून व्यसनात गुरफटलेली तरुणाई ड्रग्स, ब्राऊन शुगरच्या आहारी जात आहेत. त्यामुळे या नशिल्या पदार्थाची तस्करी करणारे जिल्ह्यात सक्रीय झाले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ब्राऊन शूगर पोलिसांनी जप्त केला आहे. दारूपेक्षाही घातक हे पदार्थ असल्याने आताच पोलीस व संबंधित विभागाने गंभीर होणे गरजेचे आहे. अन्यथा या पदार्थाचे पाळेमुळे रोवली गेली तर जिल्ह्यातील तरुणाई मोठ्या गंभीर वळणावर येऊन ठेपेल, यात शंका नाही.