तिथे बैलबंडीचे चाक नेहमीच चिखलात रुतते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:05+5:302021-09-24T04:33:05+5:30
प्रकाश काळे गोवरी : राजुरा तालुक्यातील वरुर रोड- सुमठणा पांदन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झालेली आहे. मागील वर्षी ...
प्रकाश काळे
गोवरी : राजुरा तालुक्यातील वरुर रोड- सुमठणा पांदन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झालेली आहे. मागील वर्षी या रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला होता. परंतु या पांदण रस्त्यावर शेवटपर्यंत पूर्ण मुरुम टाकण्यात आला नाही. अर्धवट मुरुम टाकल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतकऱ्यांना या बिकट वाटेवरून शेतात जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून पाणी साचलेले आहे. बैलबंडीचे चाक चिखलात फसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करीत शेतात बिकट अवस्थेत प्रवास करावा लागत आहे.
राजुरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वरुर रोड-सुमठाणा या पांदण रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून वाट काढत शेतात जावे लागत आहे. सध्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन, व अन्य प्रकारची खरीप हंगामातील अनेक पिके घेतली आहे. काही शेतकऱ्याचे सोयाबीन काढण्याकरिता आलेले आहे. परंतु रस्त्याने पाणी साचलेले आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल असल्यामुळे मजूरवर्ग शेतात येण्यास मागेपुढे पाहत आहे. साधे ट्रॅक्टर, बैलबंडी जाऊ शकत नाही. पांदण रस्त्याने बैलबंडी घेऊन गेल्यास दोन फूट खाली चिखलात बैलबंडी फसते. या पांदण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने शेतकरी शेतात जाऊ शकत नाही. शेतीसाठी लागणारी अवजारे, वस्तू, खत वाहून नेऊ शकत नाही. म्हणून अनेक शेतकरी हतबल झालेले आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वतः शिवारात येऊन पांदण रस्त्याची पाहणी करावी आणि अर्धवट असलेला पांदण रस्ता लवकर पूर्ण करून द्यावा, अशी मागणी प्रशांत हिवरे, पारखी, सुनोद धानोरकर, चेतन धानोरकर, सुरेखा हिवरे, रंजना धानोरकर, केशव धानोरकर, महादेव गायकवाड , गंगाधर वैरागडे, दिनकर धानोरकर, मारखंडी वैरागडे, गंगाधर भोंगळे, रामचंद्र गायकवाड व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
230921\161-img-20210923-wa0003.jpg
बैलबंडीचे चाक चिखलात रुतले....!