जिल्ह्यात २९ लाख वृक्ष लागवड करणार
By admin | Published: June 28, 2017 12:52 AM2017-06-28T00:52:26+5:302017-06-28T00:52:26+5:30
गेल्या वर्षी दोन कोटी झाडांची लागवड करण्याचे अभियान यशस्वी ठरल्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता तीन वर्षांमध्ये ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे.
महत्त्वाकांक्षी अभियान : १ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रात रोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या वर्षी दोन कोटी झाडांची लागवड करण्याचे अभियान यशस्वी ठरल्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता तीन वर्षांमध्ये ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात ४ कोटी ८० हजार वृक्ष लागवड केली जात असून चंद्रपूर जिल्ह्यात २९ लाख १७ हजार ८८३ झाडांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही झाडे अल्प दरामध्ये उपलब्ध करण्यात येत आहेत. तब्बल ४७ शासकीय व स्वयंसेवी यंत्रणा १ लाख २९ हजार ८४८ हेक्टरवर वृक्षारोपण करणार आहेत.
प्रदूषण नियंत्रण आणि वातावरणाचा समतोल राखण्याकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून वृक्षरोपणाचे अभियान हाती घेतले आहे. गेल्या वर्षी दोन कोटी वृक्ष लागवड केल्यावर त्याची नोंद गिनिज बुकमध्ये करण्यात आली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर वृक्षारोपण करण्यात आले होते. तो प्रयोग यशस्वी ठरल्यावर त्यांनी ५० कोटी वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात २९ लाख १७ हजार ८८३ वृक्षलागवड केली जात आहे. या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आ. अनिल सोले यांच्या नेतृत्त्वात वृक्षदिंडी काढण्यात आली. ही वृक्षदिंडी जिल्ह्यात फिरविण्यात आली. त्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
आता जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील गावागावांमध्ये वृक्षदिंडी व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले. त्याची सुरुवात मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा स्तरावर अभियानाच्या नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. भिंतीपत्रक, पत्रके, पोस्टर्स, स्टिकर्स छापून शहराच्या मुख्य ठिकाणी आणि गावावात वाटप करण्यात आले आहे. होर्डिंग्ज तयार करून चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात लावण्यात आले आहेत. तसेच हस्ताक्षर अभियानही राबविण्यात आले. त्याचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
ही हस्ताक्षर मोहीम नागपूर मार्गावरील वन विभागाच्या कार्यालयासमोर राबविण्यात आली आहे. शासकीय, निमशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था व्यतिरिक्त खासगी व्यक्तींना झाडे अल्पदरामध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. त्याकरिता वन विभागाने चंद्रपूर शहरातील वन विभागाच्या कार्यालयांपुढे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. वृक्षारोपणासाठी शासकीय कार्यालये व एनजीओंनाही अल्पदरात रोपे उपलब्ध करण्यात येत आहेत.
अल्पदरामध्ये रोपे उपलब्ध
वन विभागाने इंधन व सपरणासाठी झाडांचे एक रोप ६ रुपयांमध्ये उपलब्ध केले आहे. साधारण फळवृक्षदेखील ६ रुपये, मौल्यवान फळवृक्ष १५ रुपये (पॉलिथिन पिशवीसह) व सुटे ८ रुपये, व्यापारी, इमारती लाकूड प्रजाती ७ रुपये, बांधावर लावण्यासाठी १२ रुपये, शोभिवंत वृक्ष ११ रुपये (पॉलिथिन पिशवी) व ९ रुपये, फांद्यापासून लागवड १६ रुपये आणि इतर मौल्यवान प्रजातीची रोपे ३० रुपये व ४५ रुपयांना उपलब्ध करण्यात आले आहे.
४७ यंत्रणांना दिलेले वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
२९ लाख १७ हजार वृक्षांपैकी सर्वाधिक १२ लाखध ७६ हजार वृक्षांची लागवड वन विभाग करणार आहे. त्यानंतर वनविकास महामंडळ ८ लाख ८१ हजार ८८३ वृक्ष लावणार आहे. जिल्हा परिषद ४ लाख १० हजार, शैक्षणिक संस्था १२ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग २५ हजार, केंद्रीय शासकीय विभाग २ हजार ५००, सामाजिक वनीकरण विभाग १ लाख, ग्रामीण विकास यंत्रणा १ हजार २५०, कृषी विभाग ६२ हजार ५००, नागरी विकास विभाग २५ हजार, पोलीस विभाग ५ हजार, औद्योगिक महामंडळ १२ हजार ५००, विधी व न्याय विभाग १ हजार २५०, आदिवासी विकास विभाग ६ हजार २५०, उर्जा विभाग २ हजार ५००, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग २ हजार ५००, वाहतूक विभाग १ हजार २५०, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग ६ हजार २५०, सार्वजनिक आरोग्य विभाग २ हजार ५००, जलसंपदा विभाग २५ हजार, सहकार विभाग १२ हजार ५००, सामाजिक न्याय विभाग ६ हजार २५०, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी निर्मिती विभाग २ हजार ५००, कारागृह १ हजार २५०, राज्य उत्पादन शुल्क १ हजार २५०, कामगार विभाग १ हजार २५०, जल संवर्धन १ हजार २५०, कौशल्य विकास १ हजार २५०, महिला व बालकल्याण १ हजार २५०, पाणीपुरवठा व स्वच्छता १ हजार २५०, पदुम २ हजार ५००, अल्पसंख्यांक १ हजार २५०, घरकुल विकास २ हजार ५००, केंद्रीय रेल्वे ७ हजार ५००, राष्ट्रीय महामार्ग ७ हजार ५००, केंद्रीय संरक्षण २ हजार ५०० वृक्ष लागवड करणार आहेत.