पदोन्नतीवरून मुख्याध्यापक प्रशासनामध्ये वाद रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 11:20 PM2022-09-25T23:20:50+5:302022-09-25T23:21:28+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत आठ ते दहा वर्षांपूर्वी पटसंख्या आणि आरक्षणानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, दिवसेंदिवस शाळांतील पटसंख्या घटल्याने मुख्याध्यापक पद अतिरिक्त झाले होते. त्यामुळे पदोन्नतीने मुख्याध्यापक झालेल्या शिक्षकांना पदावनत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परिणामी, मुख्याध्यापकांना पदावनत व्हावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची काही वर्षांपूर्वी आरक्षणानुसार शिक्षकांची पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही शाळांतील पटसंख्या कमी झाल्याने मुख्याध्यापक पदावरून काहींना पदावनत करण्यात आले. दरम्यान, आता पुन्हा प्रशासनाने शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहे. यामुळे मात्र पदावनत झालेले शिक्षक आणि प्रशासनामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. प्रथम आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार मुख्याध्यापकपदी पदोन्नती द्या, त्यानंतरच अन्य शिक्षकांचा विचार करा, अशी मागणी पदावनत झालेल्या शिक्षकांनी केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत आठ ते दहा वर्षांपूर्वी पटसंख्या आणि आरक्षणानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, दिवसेंदिवस शाळांतील पटसंख्या घटल्याने मुख्याध्यापक पद अतिरिक्त झाले होते. त्यामुळे पदोन्नतीने मुख्याध्यापक झालेल्या शिक्षकांना पदावनत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परिणामी, मुख्याध्यापकांना पदावनत व्हावे लागले. दरम्यान, सेवानिवृत्त तसेच काही शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याने प्रशासनाने आता शिक्षकांना पदोन्नतीद्वारे मुख्याध्यापक पद देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत.
यासंदर्भात शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे याद्याही तयार करण्यात आल्या आहेत. याचवेळी पदावनत झालेल्या शिक्षकांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला असून जिल्हा परिषद प्रशासनाला एक निवेदनही दिले आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून कार्य केल्यानंतर पदावनत झालेल्या मुख्याध्यापकांचाही प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, त्यांना पदोन्नती करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, पदोन्नत्ती न झाल्यास न्यायालयातून न्याय मागण्याचीही काहींनी तयारी केली आहे. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक भुर्दड
पदावनत झालेले शिक्षक मुख्याध्यापकांचे वेतन घेत आहे. दरम्यान, शासनाने आता दुसऱ्याच शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापक पद देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या शिक्षकांना मूळ वेतनासह मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी द्यावी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात शासनाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
काम शिक्षकांचे, वेतन मुख्यापकांचे
- आठ ते दहा वर्षांपूर्वी शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. दरम्यान मागच्या तीन वर्षांमध्ये २८८ शिक्षकांना पदावनत करण्यात आले. यातील काही शिक्षक सेवानिवृत्त झाले.
- पद गेले असले तरी त्यांना वेतन मात्र मुख्याध्यापकांचे मिळत आहे.
मुख्याध्यापकांची नव्याने पदस्थापना करताना मागील तीन वर्षांपूर्वी पदावनत केलेल्या मुख्याध्यापकांना प्रथम संधी देण्यात यावी. यासंदर्भात प्रशासनाला संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पदावनत करताना जेव्हा केव्हा पदोन्नती होईल तेव्हा प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, यादी तयार करताना त्या आश्वासनाला विसर पडला आहे. पदोन्नती न झाल्यास यासंदर्भात वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू.
-सुधाकर पोपटे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक, उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ