तालुक्यातील वीज समस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:48 AM2018-06-15T00:48:07+5:302018-06-15T00:48:07+5:30
बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात विजेच्या समस्या आहेत. यासोबतच कृषिपंपांना मागील दोन वर्षापासून वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात विजेच्या समस्या आहेत. यासोबतच कृषिपंपांना मागील दोन वर्षापासून वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते. त्याबाबत गावकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले. त्या अनुषंगाने पालकमंत्र्याच्या सूचनेप्रमाणे बल्लारपूर पं.स. समितीचे पदाधिकारी जि.प. सदस्य व वीज मंडळाचे अधिकारी यांची चंद्रपूर येथे वीज वितरण कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात तालुक्यातील वीज समस्या अग्रक्रमाने निस्तारण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता ए. व्ही. कोरेकर यांनी दिल्या.
तालुक्यातील मानोरा, गिलबिली, कवडजई, किन्ही, कोर्टी, इटोली, पळसगाव आदी गावांना कोठारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु या भागात वीज वेळीअवेळी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कोठारी ते मानोरा ११ केव्ही स्पेशल फिडर लाईन टाकण्याची मागणी होती. त्यासाठी ७२ लाखांचे अंदाजपत्रक बनवून मंजूर झाले. त्या कामाच्या निवीदा मंजूर होवून लवकरच काम सुरु होणार आहे.
ग्रामीण भागातील जनता ७५ टक्के शेतकरी असून शेतीवर उपजिविका करतात. मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होणे व भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी अडचण होत आहे.
अशात वीज खंडित होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल व रात्रीचे भारनियमन बंद करण्याबाबत कारवाई करण्याचे सांगण्यात आले.
मागील दीड ते दोन वर्षापासून कृषिपंपांना वीज जोडणी नाही. शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. परंतु कंत्राटदार निविदा भरत नाहीत. त्यामुळे वीज जोडण्यात अडथळा होत आहे. मात्र यासाठी शासनस्तरावरुन उचित कारवाई करुन वीज जोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत अधीक्षक अभियंता ए. व्ही. कोरेकर, चंद्रपूर जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी इंगोले, कार्यकारी अभियंता बल्लारपूर के. एन. पिजदूरकर, कोठारी वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता एस. बी. मून, जि.प. सदस्य हरिश गेडाम, किशोर पंदीलवार, राजू बुद्धलवार, पं.स. बल्लारपूर सभापती गोविंदा पोडे, उपसभापती इंदिरा पिपरे, रमेश पिपरे, पं.स. सदस्य विद्या गेडाम उपस्थित होते.