बाहेरून येणाऱ्यांची होणार कडक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:30+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांचे मालक, होलसेल विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूशी संबंधित सर्व व्यापाऱ्यानी यावेळी आवश्यक मनुष्यबळ व त्यांना प्रतिष्ठानाला पोहोचण्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. विदेशात जाऊन आल्याची नोंद असणाऱ्या १९८ लोकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत आलल्या सर्व रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे येणारे दोन आठवडे आणखी जबाबदारीने वागत आवश्यकता नसेल तर घरीच राहावे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची होणार कसून तपासणी होणार असून विशेषत: तरुणांनी यासाठी काटेकोर नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शनिवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांचे मालक, होलसेल विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूशी संबंधित सर्व व्यापाऱ्यानी यावेळी आवश्यक मनुष्यबळ व त्यांना प्रतिष्ठानाला पोहोचण्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जीवनावश्यक वस्तू निर्मिती, विक्री व दुरूस्तीच्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व प्रतिष्ठानच्या कर्मचाºयांना ओळखपत्र देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. मात्र शक्य असेल तर या कर्मचाºयांना पायी येण्याबाबत निर्देश द्यावेत. रस्त्यांवर दुचाकींची संख्या अधिक झाली असून यामुळे सामाजिक अंतर राखणे कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे. मात्र अन्य राज्यातून येणारे अत्यावश्यक सामान, भाजीपाला, दूध, औषधी व अन्य वैद्यकीय सामानांचे वहन करणारे व यामध्ये सहभागी असणाऱ्या नागरिकांची आवश्यक ती तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले.
त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन न करता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी बैठकीत केले.
१९८ जणांची तपासणी, एकही पॉझिटीव्ह नाही
जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रूग्ण नसून केवळ विदेशातून आलेले सहा नागरिक आता निगराणीखाली आहेत. १९८ लोकांना तपासणीअंती धोक्याबाहेर घोषित करण्यात आले आहे. सध्या केवळ एक परदेशातून आलेला नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली.
वनसडीच्या महिलांकडून कापडी मास्क निर्मिती
कोरपना : कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतंर्गत कापडी मास्क तयार करण्याचे काम वनसडी येथील सखी महिला ग्रामसंघाच्या १३ महिलांकडून केले जात आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली आहे. हा प्रकल्प जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविला जातो.
जीवनावश्यक वस्तूच्या वाहनांना ऑनलाईन ई-पास
चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ मार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ट्रान्टपोर्ट महाराष्ट्र या संकेतस्थळावर संबंधित वाहनधारकांना अर्ज करता येते, अशी माहिती आरटीओ कार्यालयाने दिली.
बाजार समितीतील गर्दीवर नजर
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही बाब अतिशय धोकादायक आहे. याठिकाणी तातडीने उपाययोजना करून सामाजिक अंतर राखावे. जिल्ह्यामध्ये सध्या एकही रुग्ण नसताना बाहेरून येणारा धोका पत्करायचा नाही. त्यासाठी सीमावर्ती भागातील नाकाबंदी आणखी भक्कम करणे व वैद्यकीय तपासणी वाढविणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
एचआयव्ही बाधितांसाठी समुपदेशक धावणार
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एचआयव्ही बाधित रूग्णाला एआरटी औषधोपचार घेण्यास खंड पडू नये व जिल्हास्थळी एआरटी केंद्रात येण्यास त्रास होऊ नये, याकरिता नॅशनल एड्स कंट्रोल संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्तीनाथ राठोड यांच्या सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रूग्णालयाने अशा रूग्णांना त्यांच्याच तालुक्यात एआरटी औषध उपलब्ध करून दिले. त्यामुळे जिल्हास्थळी न येता तालुकास्थळी ग्रामीण रूग्णालयाच्या एचआयव्ही विभागातील समुपदेशकांशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी केले आहे.
कृषी केंद्र सुरूच राहणार
शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी ट्रॅक्टरसह दुचाकीपर्यंतच्या सर्व शोरूम सुरू करण्याचे निर्देश दिले. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिक यांनी स्वत:जवळचे ओळखपत्र दाखवून आवश्यक सेवा नागरिकांना द्यावी. पोलिसांना तशा सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.