त्यांनाही हवे वैवाहिक जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:04 AM2017-12-18T00:04:09+5:302017-12-18T00:05:03+5:30
एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे.
बल्लारपूर : एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे.
त्यांच्या या अपेक्षेची दखल सेवाभावी आणि सामाजिक संस्थांनी घेतली. त्यांच्या पुढाकाराने नुकताच एचआयव्ही बाधीत व आता पूर्ण बरे झालेल्यांकरिता वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन येथील बल्लारपूर पेपर मिल कॉलनीतील आॅडिटोरियम हॉलमध्ये करण्यात आले होते. या मेळाव्यात २५ महिला व ३७ पुरुषांनी आपला परिचय देऊन आपला जीवनसाथी कसा असावा, ही अपेक्षा व्यक्त केली.
परिचय देणाऱ्यात २० ते ४५ वर्षे पर्यंतचे स्त्री-पुरुष होते. यातील काही अविवाहित तर काहींचे पूर्वी लग्न झालेले व घटस्फोटीत होते. या मेळाव्याचे आयोजन किरण ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर, विहान प्रकल्प, शिवार संस्था चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदा वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून बिल्ट ग्राफीक्सच्या वरिष्ठ अधिकारी सुचेता ठावरी, जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, एड्स नियंत्रणाचे जिल्हा परिवेक्षक निरंजन मंगरूळकर, समुदाय देखभाल समन्वयक हेमचंद उराडे, जिल्हा महिला बालकल्याण संरक्षण अधिकारी प्रिती उंदीरवाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बल्लारपूर कार्यालयाकडून एचआयव्ही बाधिताना देण्यात येत असलेल्या शासकीय मदतीची माहिती दिली. संचालन विशाल पावडे यांनी तर आभार संगीता रोहणकर यांनी मानले.