ते आले कुबड्या घेऊन, परतले स्वत:च्या पायाने चालत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 11:07 AM2023-03-25T11:07:23+5:302023-03-25T11:12:21+5:30
जयपूर फूट शिबिरात ७०० जणांची नोंदणी : सकल जैन समाज व शांतीनाथ सेवा मंडळाचा उपक्रम
चंद्रपूर : कुणी अपघातात पाय गमावला तर कुणाला पोलिओ झाला. यामुळे सारे एकाचवेळी थांबल्यागत स्थिती झाली. अशातच माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली सकल जैन समाज आणि शांतीनाथ सेवा मंडळाच्या पुढाकारात चंद्रपुरातील जैन भवनात २७ मार्चपर्यंत जयपूर फूट, कॅलिपर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात विदर्भातील तब्बल ७०० दिव्यांगांनी नोंदणी केली. पैकी ४७५ जणांना शिबिराचा थेट फायदा झाला. अनेक दिव्यांग शिबिरात येताना कुबड्या घेऊन आले. मात्र, परतताना ते स्वत:च्या पायाने चालत गेल्याचे दृश्य बघायला मिळाले. शिबिराच्या उर्वरित दिवसांत नोंदणी केलेले दिव्यांगही याचा लाभ घेणार असल्याची माहिती सकल जैन समाजाचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी दिली.
या शिबिराला विदर्भातून प्रतिसाद मिळत आहे. दिव्यांगासाठी जयपूर फूट, कॅलिपर, कर्ण यंत्र, ट्रायसिकल व अन्य साहित्य मोफत उपलब्ध आहे. या शिबिरासाठी मुंबईहून नारायण व्यास हे आठ जणांच्या टीमसह दाखल झालेले आहेत. सहा जण जयपूर येथून आले आहेत. जयपूरचे उजागरसिंग लांबा, मुंबईचे अरविंदसिंग तौमर ही मंडळी २४ तासांत पाय उपलब्ध करून देत आहेत. शिबिरासाठी सकल जैन समाजाचे सरचिटणीस संदीप बांठिया, जितेंद्र चोरडिया, शांतीनाथ सेवा मंडळाच्या शकुंतला बांठिया, अर्चना मुनोत, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे व अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
त्यांनी २.३० लाखांचा कृत्रिम पाय काढून फेकला
वर्धा जिल्ह्यातील सेलूकाटे येथील अमलेश हिवंज यांचा २००२ मध्ये अपघात झाला. एका पायाच्या हाडाचा संसर्ग झाल्याने २०२२ मध्ये त्यांना पाय कापावा लागला. नंतर त्यांनी नागपुरातून २ लाख ३० हजारांचा कृत्रिम पाय बसवला. मात्र, त्यांना चालताना त्रास होत होता. ते शिबिरात दाखल झाले. त्यांनी महागडा कृत्रिम पाय काढून फेकला. आता जयपूर फूटचा लाभ घेतला.
२८ देशात २५ लाख लोकांना जयपूर फूट
जयपूर फूटचे शिबिर २८ देशात पार पडले. सुमारे २५ लाख दिव्यांग जयपूर फूटने चालत आहेत. भारतात २८ केंद्रांतून हे काम चालते, अशी माहिती जयपूर फूटचे महाराष्ट्राचे प्रभारी नारायण व्यास यांनी दिली. २० वर्षांपासून घरी बसून असलेल्या विसापूर येथील रामेश्वरी आत्रामला ट्रायसिकल देण्यात आली. अनिता राऊत या पोलिओग्रस्त महिलेने पहिल्यांदाच या शिबिराचा लाभ घेतला. गडचिरोली जिल्ह्यातील पेटतळाचे सरपंच रमेश कन्नाके यांनीही शिबिराचा लाभ घेतला.