आधार लिंक नसल्याने त्यांना गमवावे लागले प्राण, ...असा घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:21 AM2021-05-13T09:21:52+5:302021-05-13T09:22:32+5:30
सुदर्शन नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ मे रोजी दाखल करण्यात आले.
नितीन मुसळे -
सास्ती (चंद्रपूर) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केल्याने रुग्णांची धावपळ व गोंधळ कमी व्हावा यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पोर्टलवर नाव नोंदणी करण्यासाठी त्या रुग्णाचे आधार कार्ड मोबाइलला जोडले गेले नसल्याने तीन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असतानाही राजुरा उपजिल्हा रुग्णालयात एका गंभीर रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या कोरोनाकाळातही जगण्यासाठी आधार लिंक अत्यावश्यक ठरली आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल सुरू केले. त्या माध्यमातून जिल्ह्यातील २६ कोविड रुग्णालयातील २५१ साधे बेड, ७४४ ऑक्सिजन बेड, १९७ आयसीयू बेड, ८४ व्हेंटिलेटर बेड अशा एकूण १२७६ बेडच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवून रुग्णांना त्यांच्या मोबाइलमध्येच बेडची उपलब्धता पाहून रुग्णालयाची पायपीट थांबविण्याच्या हेतूने सुविधा उपलब्ध करून दिली. या पोर्टलवरून बेड उपलब्धतेसाठी रुग्णाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइलवर एक ओटीपी येतो व तो ओटीपी त्यात टाकल्याशिवाय रुग्णासाठी बेड उपलब्ध होत नाही. याच जाचक अटीचा फटका राजुरा उपजिल्हा रुग्णालयात अखेरची घटका मोजत असलेल्या साखरी (वा.) येथील ५५ वर्षीय सुदर्शन नागोसे यांना बसला.
...असा घडला प्रकार
सुदर्शन नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ मे रोजी दाखल करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवरून व्हेंटिलेटर बेडची शोधाशोध सुरू झाली. यावेळी पोर्टलवर तीन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असल्याचे दाखवित होते; परंतु आधार लिंक नसल्यामुळे त्यांना दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतरही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ शकला नाही.