आधार लिंक नसल्याने त्यांना गमवावे लागले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:31+5:302021-05-13T04:28:31+5:30
नितीन मुसळे सास्ती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण करून अनेकांचे प्राण घेतले. या लाटेत रूग्णांना व त्यांच्या ...
नितीन मुसळे
सास्ती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण करून अनेकांचे प्राण घेतले. या लाटेत रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड नाही तर केवळ रूग्णालयात भरती होण्यासाठीही पायपीट करावी लागली आहे. अशातच या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट हे ऑनलाईन पोर्टल तयार केले. परंतु या पोर्टलवरील जाचक अटीमुळे मात्र राजुरा उपजिल्हा रूग्णालयात एका गंभीर रूग्णाला आपला जीव गमवावा लागला. कारण एवढेच की त्याचे आधारकार्ड मोबाईलला लिंक नव्हते.
त्यामुळे त्याला या ऑनलाईन पोर्टलवरून जिल्ह्यात तीन व्हेंटिलेटर बेड शिल्लक असतानाही ते न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. या कोरोना काळातही जगण्यासाठी आधार लिंक अत्यावश्यक ठरली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढलेला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रूग्ण बाधित होत आहे. त्यातील शेकडो रूग्णांना रूग्णालयात दाखल करून उपचार करावे लागत आहे. अनेक रूग्ण गंभीर होत आहे. मोठ्या संख्येने रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांना चांगलीच पायपीट करावी लागत आहे. अशी सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाने चंद्रपूर कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल सुरू केले. त्या माध्यमातून जिल्ह्यातील २६ कोविड रूग्णालयातील २५१ साधे बेड, ७४४ ऑक्सिजन बेड, १९७ आयसीयू बेड, ८४ व्हेंटिलेटर बेड अशा एकूण १२७६ बेडच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवून रूग्णांना त्यांच्या मोबाईलमध्येच बेडची उपलब्धता पाहून रूग्णालयाची पायपीट थांबविण्याच्या हेतूने सुविधा उपलब्ध करून दिली. या पोर्टलमुळे अनेकांना जिल्ह्यात बेडची उपलब्धता शोधण्यास मदतच झाली. परंतु ग्रामीण भागातील रुग्णांना मात्र या पोर्टलचा लाभ त्यांच्या अज्ञानामुळे घेता आला नाही. या पोर्टलवरून बेड उपलब्धतेसाठी रुग्णाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येतो व तो ओटीपी त्यात टाकल्याशिवाय रुग्णासाठी बेड उपलब्ध होत नाही. याच जाचक अटीचा फटका राजुरा उपजिल्हा रुग्णालयात अखेरची घटका मोजत असलेल्या साखरी (वा) येथील ५५ वर्षीय सुदर्शन नागोसे यांना बसला व त्यांना या आधार लिंक अभावी आपले प्राण गमवावे लागले.
बॉक्स
असा घडला प्रकार
सुदर्शन नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी राजुरा येथील खासगी रुग्णालयात धाव घेतली. परंतु प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांनी त्यांना चंद्रपूर येथे उपचारार्थ नेले. तेथे त्यांचा सिटी स्कॅन केल्यानंतर स्कोअर १४/२५ असल्याने कोविड टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. परंतु चंद्रपूर येथे कोणत्याच कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांना राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ मे रोजी दाखल करण्यात आले. प्रकृती ढासळल्याने ऑनलाईन पोर्टलवरून व्हेंटिलेटर बेडची शोधाशोध सुरू झाली. रूग्ण अत्यवस्थ असल्याने त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नेमका कुठला हे कळत नव्हते. त्यांच्या मुलाने व रूग्णालयातील स्टाफने अनेक प्रयत्न केले. यावेळी पोर्टलवर तीन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असल्याचे दाखवित होते. परंतु आधार लिंक नसल्यामुळे त्यांना दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतरही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ शकला नाही.