लॉकडाऊनमुळे अनेकांनी जपून ठेवल्या लॉकरमध्येच अस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:50 PM2020-05-19T20:50:35+5:302020-05-19T20:52:32+5:30
लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करून काही कुटुंबीय विविध धार्मिक ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी घेऊन जातात. मात्र लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत. चंद्रपूर शहरातील शांती धाममध्येही परवागनीविना काही व्यक्तींच्या अस्थी लॉकरमध्ये जपून ठेवण्यात आल्या आहेत.
मृत्यूनंतर अस्थी विसर्जन करण्याच्या विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रथा-परंपरा पाळताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे विदर्भात वर्धानदीच्या वढा संगम, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथील वैनगंगा नदी व माहूर येथेही अस्थी विसर्जन करण्यासाठी नेल्या जाते. मात्र लॉकडाऊनमुळे बंधने आली. बाहेर गावी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असल्याने अस्थीचे विसर्जन कुठे करावे, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. काहींनी आपल्या आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत स्मशानघाटातील लॉकरमध्ये अस्थी सुरक्षित ठेवल्या आहेत. चंद्रपूर शहरातील शांतीधाममध्ये अस्थी ठेवण्यासाठी १६ लॉकरची व्यवस्था आहे. या लॉकरमध्ये सध्या १० अस्थी ठेवल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवसच अस्थी ठेवल्या जात होत्या. काही कुटुंब अस्थी विसर्जन करण्यासाठी प्रशासकीय परवानगी मागत असून परवानगी मिळाल्यानंतरच त्या अस्थी येथून नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इरईच्या पात्रात अस्थीचे विसर्जन
लॉकडाऊन व शासकीय परवानगीचा ससेमीरा टाळण्यासाठी काही कुटुंबीय इरई नदीच्या पात्रात अस्थी कलशाचे विसर्जन करीत आहे. यात वेळ व पैशाचीही बचत होत आहे. काही जण सोयीनुसार आपआपल्या पद्धतीने अस्थीचे विसर्जन करीत आहेत.
लॉकडाऊनपूर्वी शांतीधाममध्ये असलेल्या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवस अस्थी ठेवल्या जात होत्या. मात्र सध्या अस्थी ठेवण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. अनेक जण आपल्या इच्छेनुसार अस्थीकलशचे विसर्र्जन करतात. मात्र आता ये-जा करण्याची परवानगी घ्यावी लागत असल्याने निर्बंध आले आहे.
- नरेंद्र गर्गेलवार,
टालव्यवस्थापक, शांतीधाम चंद्रपूर