‘ते’ एका महिन्यात करतात दोन हजाराहून अधिक रुग्णांवर नि:शुल्क उपचार
By admin | Published: October 25, 2014 01:09 AM2014-10-25T01:09:47+5:302014-10-25T01:09:47+5:30
आपल्या हाताच्या कौशल्याने गेल्या २० वर्षापासून ते रुग्णांची नि:शुल्क सेवा करताहेत.
रत्नाकर चटप लखमापूर
आपल्या हाताच्या कौशल्याने गेल्या २० वर्षापासून ते रुग्णांची नि:शुल्क सेवा करताहेत. महिन्याला दोन हजाराहून अधिक रुग्ण त्यांच्याकडून उपचार घेऊन मोठ्या आनंदाने परत जातात. गिरीधर काळे, असे या किमयागाराचे नाव असून कोरपना तालुक्यातील बिबी येथील ते रहिवासी आहेत. त्यांचे हे समाजकार्य आजही अविरत सुरूच आहे.
मोडलेल्या, लचकलेल्या अस्थिवर गिरीधर काळे आपल्या हाताने उपचार करून अस्थिंना जोडतात. त्यांचे हात एखाद्या मशीनसारखे काम करतात. वयाच्या १६ व्या वर्षापासून गिरीधरांचे हे समाजकार्य सुरू आहे. शेती हा मुळ आणि वडिलोपार्जित व्यवसाय करून समाजसेवेचे व्रत पार पाडताना आधुनिक शेतीचे तंत्रही त्यांनी अंगीकारले आहे. आपल्या आजोबापासून त्यांनी हे बाळकडू घेतले. आज अस्थी रुग्णांसाठी ते देवदूतच ठरले आहेत.
पहाटेपासून तर रात्रीपर्यंत त्याची ही सेवा अविरत सुरू असते. कधी शेताच्या बांधावर तर कधी घरी तर कुठे कुणाच्या लग्नात, कार्यक्रमातही रुग्ण हजर होतात. अशावेळी नकार न देता ते उपचार करण्यास तत्पर असतात. त्यामुळेच आज जिल्हासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून अस्थिरुग्ण गिरीधरांकडे उपचारासाठी येत आहेत. कोणत्याही रुग्णांकडून एक रुपयाही न घेता ते नि:शुल्क सेवा करीत आहेत. नामवंत डॉक्टरांना साध्य न झालेले अस्थिवरील उपचार त्यांनी केले आहे. याची साक्ष आज जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध अस्थितज्ञ देतात. गेल्या २० वर्षांपासून गिरीधरांनी रुग्णांची नोंद ठेवली नाही. कुठल्याही आर्थिक मदतीची अपेक्षा केली नाही. रुग्ण बरा होऊन परत येतो, यातच माझ्या परिश्रमाचे फळ आपणाला मिळते, असे ते आनंदाने सांगतात. त्यांच्याकडे रुग्णांची नोंद असावी, असा आग्रह धरीत गावातील सेवार्थ ग्रुपच्या युवकांनी गेल्या दोन महिन्यापासून नोंदणी अभियान सुरू केले आहे. यात महिन्याला गिरीधर दोन हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करतात व महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेशातीलही रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे नोंदणी रजिस्टरवरून कळते. या कार्यात त्यांची आई, पत्नी, तीन भाऊ यांचेही योगदान आहे.
गिरीधर काळे यांच्या कार्याची महती सर्वदूर पसरली आहे. त्याची उपचार पद्धती व यश बघून याआधी अनेक नामवंत अस्थितज्ज्ञांनी मोठे मानधन देऊन रुग्णालयात काम करण्याची विनंती केली. मात्र जनसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणत गिरीधरांनी गावातच राहून सेवेचे व्रत अंगिकारले आहे. त्यामुळे बिबी गावाचा व गावकऱ्यांचाही नावलौकीक होत असल्याचे गावकरी सांगतात. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने घ्यावी व त्यांचा सन्मान व्हावा ही गावकऱ्यांची इच्छा आहे. नुकताच सेवार्थ ग्रुप व साई स्पोर्टिंग क्लब बिबीच्या वतीने गावकऱ्यांनी गिरीधर काळेंचा ‘लोकसेवक’ म्हणून सत्कार केला. तर राजुरा मुक्ती संग्राम उत्सव समितीनेही राजुराभुषण पुरस्कार देऊन गिरीधर काळे यांना गौरविले आहे.
अनेकदा बाहेर जिल्ह्यातून त्यांच्याकडे उपचारासाठी रुग्ण येतात. यावेळी कधी रुग्ण मुक्कामाने राहतात. अशा रुग्णांना राहायला जागा, पांघरून आणि भोजनाची व्यवस्थाही गिरीधर स्वत: करतो. अशा या समाजसेवकाची शासनाने दखल घ्यावी, अशी इच्छा आहे.