त्यांनी झाडे लावली आणि जगवली सुद्धा
By admin | Published: July 4, 2016 12:46 AM2016-07-04T00:46:49+5:302016-07-04T00:46:49+5:30
झाडे लावणे, ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांनी कोणताही गाजावाजा न करता झाडे लावली आणि ती जगवलीसुद्धा आहेत.
नागभीड : झाडे लावणे, ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांनी कोणताही गाजावाजा न करता झाडे लावली आणि ती जगवलीसुद्धा आहेत.
नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कानपा येथील वासुदेवराव पाथोडे या आदिवासी कनिष्ठ कला महाविद्यालयातील शिक्षकांने ही करामत केली आहे. या शाळेने मागील वर्षी शाळेच्या परिसरात विविध जातीची अंदाजे १५० झाले लावली. ही झाडे लावण्यासाठी त्यांना कोणी आग्रह केला नाही. स्वयंस्फूर्तीने ते पुढे आले आणि वृक्षारोपण केले. वृक्षारोपण करुनच ते मोकळे झाले नाही तर, लावलेली झाडे जगविण्याचा त्यांनी निर्धार केला.
ही वृक्ष लागवड पावसाळ्यात करण्यात आल्याने पावसाळ्यात त्यांना या झाडांना पाणी घालण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. मात्र शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर उन्हाळ्यात या झाडांना जगवायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला. यावर त्यांनी विचार विनिमय करुन या झाडांना पाणी घालण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली. प्रत्येकाला दिवस वाटून दिले. ठरल्याप्रमाणे हे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी झाडांना पाणी घालू लागले. झाडांची एकंदर स्थिती लक्षात घेवून संस्थेचे अध्यक्ष गजानन पाथोडे यांनी या झाडांसाठी कठड्यांची व्यवस्था पण करून दिली. आज ही झाडे डोलदार झाली आहेत. लावण्यात आलेल्या १५० झाडांपैकी ११० ते ११५ झाडे डौलाने मिरवित आहेत. मुख्यध्यापक राजू निकुरे आणि प्राथमिक विभागाचे मुख्यध्यापक कदीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची संपूर्ण चमू या झाडांची निगा राखत आहेत. (तालुका प्रतिनिधी)