'ते' वक्तव्य जिल्हा रूग्णालयाचे प्रमुख अधिकारी शल्य चिकित्सकांनाच उद्देशुन - हंसराज अहिर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 03:25 PM2017-12-26T15:25:40+5:302017-12-26T15:27:06+5:30
अन्य डॉक्टरांच्या बाबतीत हे विधान नव्हते, त्याचा विपर्यास केला जाऊ नये, त्यात दुरूस्ती व्हावी अशी अपेक्षा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली
चंद्रपूर - जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाद्वारे पुरस्कृत लोकाभिमुख, महत्वकांक्षी अमृत दीनदयाल फार्मसीचे लोकार्पण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सकासारख्या प्रमुख शासकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम असताना त्यांचीच अनुपस्थिती असल्याने या प्रमुख शासकीय अधिका-यांच्या अनुपस्थितीला घेवून लोकशाही शासन व्यवस्था व सभ्यतेवर विश्वास नसणा-या अशा प्रमुख शासकीय वैद्यकीय अधिका-याने नक्षलवादी व्हावे असे उपरोधिक विधान नाराजीच्या भावनेतून केले. अन्य डॉक्टरांच्या बाबतीत हे विधान नव्हते, त्याचा विपर्यास केला जाऊ नये, त्यात दुरूस्ती व्हावी अशी अपेक्षा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली.
सामान्य रूग्णालय परिसरातील सदर उद्घाटन कार्यक्रम असताना प्रमुख शासकीय वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहतात हा प्रकार दुर्दैवी वाटल्याने त्यांच्या बाबतीतच विधान केले, अन्य डॉक्टरांबाबतीत ते नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनुपस्थित असल्याचे मला कळले होते. त्यामुळे त्यांनाही उद्देशुन हे वक्तव्य नव्हते. ज्या कार्यक्रमास स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री, आमदार, महानगराच्या महापौर, उपमहापौर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असताना, त्यांच्याच रूग्णालय परिसरात कार्यक्रम होत असताना मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांसारखे प्रमुख जबाबदार शासकीय अधिकारी याप्रसंगी अनुपस्थित राहून मार्गदर्शन करणे टाळतात. प्रधानमंत्र्यांच्या गोरगरीबांसाठी असलेल्या अशा महत्वाकांक्षी योजनेकडे पाठ फिरवितात याचे शल्य वाटल्याने लोकशाहीवर विश्वास नसलेल्या अशा जबाबदार शासकीय वैद्यकीय अधिका-याबाबत असे वक्तव्य करणे भाग पडल्याचे ते म्हणाले.
डॉक्टरांचा सदैव सन्मान करणारा मी व्यक्ती आहे. माझे वडीलही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. लोकसभा क्षेत्रामध्ये एम्स, आयएमए व स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्यातुन अनेक स्वास्थ्य विषयक कार्यक्रम घेतले आहेत. अनेक शिबिरांचे आयोजन डॉक्टरांच्या सहकार्यातुनच यशस्वी केले आहे. अशा रूग्णसेवेतील समर्पित डॉक्टरांबाबत अनुदार वक्तव्य कधीही केले नाही त्यांचा सदैव आदरच केला आहे.
आयोजित कार्यकमास जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी, सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, स्थानिक डॉक्टर मंडळी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक वेळात वेळ काढून उपस्थित असताना जिल्हा सामान्य रूग्णालयाचे प्रमुख शासकीय अधिकारी जे जबाबदार आहेत, तेच केंद्र शासनाच्या स्वास्थ्य विभागाशी निगडीत कार्यक्रमात उपस्थित राहणे अपरिहार्य असताना तेच अनुपस्थित राहिल्याने त्यांना उद्देशुन उपरोक्त वक्तव्य केले. त्याबाबत विपर्यास होवू नये अशी प्रामाणिक भावना यामागे आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कुणाच्याही भावना दुःखविण्याचा यामागे उद्देश नव्हता त्यामुळे डॉक्टरांनी या वक्तव्याला मनावर घेवून नये असेही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातून स्पष्ट केले आहे.