चौफेर पाणी असताना ते बेटावर फुलवितात शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:55+5:302021-07-13T04:06:55+5:30
लोकमत विशेष दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून प्रवास : सर्जाराजाही नदी पात्रात घेतात उडी नीलेश झाडे गोंडपिपरी : समुद्रासारखे चौफेर ...
लोकमत विशेष
दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून प्रवास : सर्जाराजाही नदी पात्रात घेतात उडी
नीलेश झाडे
गोंडपिपरी : समुद्रासारखे चौफेर अथांग पसरलेले पाणी. त्यात मध्यभागी असलेल्या बेटावर शेती फुलविण्याचा विचारही कुणी करणार नाही. मात्र गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेटावर शेती फुलविण्याचा दिव्य पराक्रम केला. ही शेती फुलविण्यासाठी दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून त्यांना रोजच जावे लागते. आपल्या आवडत्या बळीराजाच्या सोबतीला सर्जाराजाही नदी पात्रात उडी घेतात. निसर्गाच्या रौद्र रूपाला छातीवर झेलणारे हे जिगरबाज शेतकरी शिवनी गावातील आहेत.
गोंडपिपरी तालुक्याला वर्धा-वैनगंगा नदीने वेढले आहे. या दोन्ही नद्या शिवनी गावाजवळ एक होतात. पावसाळ्यात या संगमाला समुद्राचे रूप प्राप्त होते. या संगमाच्या मध्यभागी दोन मोठ्या टेकडी आहेत. एका टेकडीला मोठा कुर्ता, दुसऱ्याला लहान कुर्ता म्हणून ओळखले जाते. या दोन्ही टेकडीवर शिवनी गावातील शेतकऱ्यांची जवळपास तीनशे ते चारशे एकर शेती आहे. शेतात कपाशी, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात.
पावसाळ्याचा सुरुवातीला नदी पात्रात पाणी कमी असते. नदी पात्रातून बैलबंडी सहज जाऊ शकते. त्यादरम्यान शेतीची मशागत येथील शेतकरी आटोपून टाकतात. पहिल्या पावसातच संगमात चौफेर पाणी दिसू लागते. या पाण्यातून नावेने मार्ग काढीत शेतकरी बेट गाठतात. शेतीची अवजारे, बि-बियाणे, मजूर साऱ्यांनाच दुथळी भरून वाहणाऱ्या नदी पात्रातून जावे लागते. आपल्या आवडत्या बळीराजाची सोबत कशी सोडणार? तेही नदी पात्रात उडी घेऊन बेट गाठतात. शिवनी येथील शेतकऱ्यांचा हा रोजचाच प्रवास. अथांग पाणी बघून काळजाचा जिथे ठोका चुकतो, तिथे मात्र शिवनीतील जिगरबाज शेतकऱ्यांनी शेती फुलविली आहे.
बॉक्स
प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वत:ची नाव
या दोन्ही कुर्तावर ज्यांची शेती आहे, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वमालकीची नाव आहे. या नावेत तीन ते चार व्यक्ती प्रवास करू शकतात. मात्र शासनाने मोठी नाव दिल्यास बेटाकडे जाण्याचा प्रवास सुकर होईल, अशी प्रतिक्रिया शिवनी येथील शेतकरी सखाराम गद्दे यांनी दिली.
बॉक्स
संगमाकडे जाणारी वाट चिखलमय
शिवनी गावापासून संगम जवळपास एक कि.मी. अंतरावर आहे. मार्ग पक्का नाही. त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय होऊन जातो. ये-जा करणे कठीण होऊन जाते. या मार्गाचे पक्के बांधकाम करण्याची मागणी मारोती मंडरे या शेतकऱ्यांनी केली आहे.