भाडेकरूचे सामान रस्त्यावर फेकले
By admin | Published: May 22, 2014 12:56 AM2014-05-22T00:56:46+5:302014-05-22T00:56:46+5:30
घरमालकाने भाडेकरूला घर खाली करून मागितले.
वरोरा: घरमालकाने भाडेकरूला घर खाली करून मागितले. भाडेकरूने काही वेळ मागितला. मात्र भाडेकरू घरी नसताना घरमालकाने दाराचे कुलूप तोडून घरातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले. याबाबत भाडेकरूने वरोरा पोलिसात तक्रार केल्याने पोलिसांनी आठ व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दिलीप खैरे हे वरोरा शहरातील मालविय वॉर्डातील परसराम भालेराव यांच्या घरी मागील काही महिन्यापांसून किरायाने रहात होते. दिलीप खैरे यांना घरमालकाने घर खाली करून देण्याची सूचना यापूर्वीच दिली होती. परंतु नवीन घराचा शोध घेऊन घर मिळाल्यावर खाली करून देतो, असे त्यांनी सांगितले. किरायादार दिलीप खैरे आपल्या कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास चार व्यक्तींनी खैरे यांच्या घरातील दाराचे कुलूप तोडले व घरातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले. साहित्य रस्त्यावर फेकलेले पाहून नागरिकांचीही तिथे एकच गर्दी झाली. त्यांच्यापैकी एकाने याबाबत भाडेकरू दिलीप खैरे यांना माहिती दिली. सामान रस्त्यावर फेकल्याचे माहित होताच त्यांनी वरोरा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन वरोरा पोलिसांनी परसराम भालेराव, रंजन भालेराव, किशोर भालेराव व इतर चार व्यक्तीविरुद्ध कलम ४५२, ३४१, १0७ भादंविनुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)