८ वर्षीय भावाच्या गळ्याला चाकू, ५ वर्षीय बहीण धावली मदतीला अन्..; चंद्रपुरातील थरारक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 02:32 PM2022-12-14T14:32:43+5:302022-12-14T15:01:18+5:30
घराच्या परिसरात माकडांनी उच्छाद मांडल्याने महिला त्यांना हाकलण्यासाठी घराबाहेर गेली चोरट्याने हीच संधी साधली
सिंदेवाही (चंद्रपूर) : बाजारातून ५० रुपयांचा चाकू खरेदी करून भरदिवसा एक चोरटा चोरीच्या इराद्याने एका घरात शिरला. त्याने काही कळायच्या आत घरातील आठ वर्षांच्या भावाच्या गळ्याला चाकू लावला. हे दृष्य बघून पाच वर्षीय बहिणीने चोर...चोर...असे ओरडत आईकडे धाव घेतली. हा आवाज ऐकून परिसरातील लोकही तिकडे धावून आले.
आता काही खरे नाही म्हणून चोरीच्या इराद्याने आलेल्या चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि सिंदेवाही पोलिसांच्या स्वाधीन केले. ही थरारक घटना सिंदेवाही शहरातील महाकाली नगरात मंगळवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास सपना संतोष जुमनाके यांच्या घरी घडली.
अविनाश ईश्वर गोडसेलवार (२२, रा. चिमढा, ता. मूल) असे आरोपीचे नाव आहे. सिंदेवाही पोलिसांनी त्याच्या विरुद्ध विवध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सपना संतोष जुमनाके यांच्या घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या व त्यांचा आठ वर्षांचा मुलगा व पाच वर्षांची मुलगी घरी होते. दुपारी घराच्या परिसरात माकडांनी उच्छाद मांडल्याने सपना जुमनाके या मुलीसह त्यांना हाकलण्यासाठी घराबाहेर गेल्या. तेवढ्यात अविनाश गोडसेलवार हा हातात चाकू घेऊन चोरीच्या इराद्याने घरात शिरला. त्याने घरात असलेल्या आठ वर्षांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावून आईने पैसे कुठे ठेवले आहेत ते सांग नाहीतर चाकूने मारतो, अशी धमकी दिली.
भीतीपोटी मुलाने फ्रिजकडे बोट दाखवून त्यावर एक डब्यात ठेलल्याचे सांगितले. तेवढ्यात पाच वर्षीय मुलगी दारात आली. तिने हे दृश्य बघताच घाबरून चोर..चोर... म्हणत आईकडे धाव घेतली. ही बाब परिसरातील लोकांना ऐकू जाताच त्यांनीही धाव घेतली. लोकांचा आवाज ऐकू येताच चोरट्याने घरातून धूम ठोकली. मात्र नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर महाकालीनगरामधील सर्व महिलांनी पोलीस निरीक्षक योगेश घारे यांची भेट घेऊन वारंवार चोरी होत असल्याचे सांगितले.
म्हणून ‘तो’ आला चोरी करायला
आरोपी अविनाश गोडसेलवार याच्याकडे दुचाकी गाडी आहे. ती कर्जावर घेतली आहे. मात्र त्याच्याकडे कर्जाचे हप्ते भरायला पैसे नसल्याने त्याने चोरीचा प्रयत्न केला. यासाठी त्याने आधीच सर्व तयारी केल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली.