चोरीच्या दुचाकीची चोरट्याने केली तेलंगणात विक्री; पाच गुन्हे उघडकीस
By साईनाथ कुचनकार | Published: June 10, 2023 07:08 PM2023-06-10T19:08:01+5:302023-06-10T19:08:19+5:30
दुचाकी चोरी करून ती कमी रकमेत विक्री करणाऱ्या दुचाकी चोराला जिवती पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली.
चंद्रपूर : दुचाकी चोरी करून ती कमी रकमेत विक्री करणाऱ्या दुचाकी चोराला जिवती पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक लाख ३० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. सुरेश ऊर्फ गोकुळ बापूराव राठोड (३२) रा. झानेरी असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, त्याने दुचाकी तेलंगणा राज्यात विकल्याचे पोलिसांना सांगितले.
दमपूर मोहदा येथील सरपंच नारायण वाघमारे यांनी त्यांच्या मालकीची होंडा शाइन चोरी गेल्याची तक्रार जिवती पोलिसांत केली होती. त्यानंतर सहा दिवसांनी ३१ मे रोजी जिवती येथील दिगांबर इंद्राळे यांनीही होंडा शाइन कंपनीची दुचाकी चोरीची तक्रार केली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता संशयित आरोपी सुरेश ऊर्फ गोकुळ बापूराव राठोड (३२) याला झानेरी परिसरातून अटक केली.
अधिक चौकशीत त्याने एक दुचाकी तेलंगणा राज्यातील बेला येथील इसमाला विक्री केल्याची व दुसरी दुचाकी तेलंगणा राज्यातील नातेवाइकाकडे ठेवल्याची कबुली केली. शेणगाव येथील राजू नागू जाधव यांनी गडचांदूर पोलिस स्टेशन येथे २५ मे २०२३ ला गडचांदूरवरून आपली दुचाकी चोरी गेल्याची तक्रार केली होती. तपासात त्यांचीही दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल रामटेके, पोलिस शिपाई शरद राठोड, पोलिस शिपाई अमोल कांबळे, गोपाल किरडे यांच्या पथकाने केली.