प्रेयसीसाठी ‘ते’ बनले चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:36 AM2018-12-12T00:36:25+5:302018-12-12T00:36:48+5:30
आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिला वेगवेगळे महागडे बक्षीस घेऊन देण्यासाठी प्रेमवीराने वाहन चोरी सुरु केली. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच त्यांनी एका अल्पवयीन बालकासह दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून चोरीची सहा वाहने जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिला वेगवेगळे महागडे बक्षीस घेऊन देण्यासाठी प्रेमवीराने वाहन चोरी सुरु केली. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच त्यांनी एका अल्पवयीन बालकासह दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून चोरीची सहा वाहने जप्त केली. तपासादरम्यान प्रेयसीला खुश करण्यासाठी चोरी करीत असल्याचे त्यांनी कबुल केले. असलम अबरार अंसारी (२१) आकाश अरविंदसिंग राजपूर (१९) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
माजरी पोलीस ठाण्यांतर्गत मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. माजरी कुचना वसाहत परिसरात अनेक दुचाकी चोरीच्या तक्रारीची माजरी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात दुचाकी चोरट्यांचा तपास सुरु होता. असलम अबरार अंसारी, आकाश अरविंदसिंग राजपूत या दोघांनी चोरी केलेली वाहने माजरी येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील एका अल्पवयीन बालकाच्या घरी लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन बालकाच्या घरी छापा टाकला.
यावेळी चोरीच्या तीन वाहनांसह अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान अल्पवयीन बालकाने असलम व आकाश या दोघांची नावे सांगितली. त्यांनतर त्यांनाही पोलिसांनी अटक केली. असलम अबरार अंसारी याने प्रेयसीला खुश करण्यासाठी प्रेयसीच्या दोन भावांना चोरीच्या दुचाकी भेट दिली, तर आकाश राजपूत याने प्रेयसीला दुचाकी भेट दिल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून दोन लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सयद अहमद, हरिदास चोपणे, प्रफुल्ल गारघाटे, श्रीकांत मोगरम यांच्या पथकाने केली.