चोरट्यांचा धुमाकूळ, ६८ तोळे सोने लंपास
By admin | Published: April 12, 2017 12:53 AM2017-04-12T00:53:45+5:302017-04-12T00:53:45+5:30
येथील पठाणपुरा परिसरातील ठक्कर कॉलनी येथील कुलूप बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी १३ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले.
चंद्रपुरात धाडसी चोरी : पठाणपुराच्या ठक्कर कॉलनीतील घटना
चंद्रपूर : येथील पठाणपुरा परिसरातील ठक्कर कॉलनी येथील कुलूप बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी १३ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले. ही घटना मंगळवारला सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर श्वान पथकासह दाखल झाले. मात्र कोणत्याही प्रकारचे पुरावे हाती लागले नाही. चंद्रपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून यापुर्वीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
ठक्कर कॉलनीतील रहिवासी यशराज नंदकिशोर मुनोत हे ८ एप्रिलला आपल्या परिवारासोबत रतलाम (उजैन) येथे गेले होते. मंगळवारला सकाळी साडे सात वाजता घरी परत आल्यानंतर फाटकाचे ग्रिल व कुलूप तुटलेले दिसले. त्यावरुन त्यांना घरी चोरी झाल्याचा अंदाज आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटसुद्धा उघडलेले होते. तसेच कपाटातील सर्व सामान पलंगावर अस्तावस्त स्थितीत दिसून आले. त्यावेळी त्यांनी आपल्या सामानाची पाहणी केली असता, ६८५ ग्राम सोन्याचे दागिने गायब होते.
सोन्याचे दागिने मुनोत यांना त्यांच्या लग्नाच्या वेळी सासरकडील मंडळींकडून बक्षीस मिळाले होते. मात्र चोरट्यांनी हे सर्व दागिने लंपास केले. याबाबतची तक्रार मुनोत यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, एसडीपीओ नायक, एलसीबीचे अधिकारी अंभोरे हे आपल्या पथकासह मुनोत यांच्या घरी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत ठसे तज्ज्ञ, श्वान पथक आले.
परिसराची चौकशी केली असता, कुठलाही प्रकारचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, एसडीपीओ नायक, ठाणेदार ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे एपीआय बोंदरे करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)