चोरट्यांनी क्षेत्र सहाय्यक कार्यालय फोडले; जेवण केले अन् नंतर पळवला वाघाचा पंजा
By परिमल डोहणे | Published: September 16, 2022 06:30 PM2022-09-16T18:30:01+5:302022-09-16T18:44:49+5:30
सावली वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक कार्यालय व्याहाड खुर्द येथील घटना
चंद्रपूर : कुलूपबंद असलेले क्षेत्र सहायक कार्यालय फोडून चोरट्यांनी चक्क स्वयंपाक केला. जेवणावर यथेच्छ ताव मारल्यानंतर कार्यालयातील टिनाची पेटी फोडून तेथील वाघाच्या नखांसह असलेला पंजा पळविल्याची खळबळजनक घटना सावली वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहाय्यक कार्यालय व्याहाड खुर्द येथे गुरुवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे त्याच पेटीमध्ये वाघाचे नख, दात असतानाही चोरट्यांनी त्याला हातही लावला नाही. पोलिसांनी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सावली अंतर्गत व्याहाड खुर्द येथे क्षेत्र सहायकांचे शासकीय निवासस्थान आहे. त्याच निवासस्थानात क्षेत्र सहायक कार्यालय आहे. येथे क्षेत्र सहाय्यक म्हणून रवी सुर्यवंशी कार्यरत आहेत. परंतु ते २६ ऑगस्टपासून सुट्टीवर गेले आहेत. त्यांचा अतिरीक्त प्रभार पंढरीचे क्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम यांच्याकडे आहे.
गुरुवारी सकाळी स्वच्छता कर्मचारी साफसफाई करण्याकरिता गेला असता कार्यलयाच्या दरवाज्याचे समोरील कुलुप तोडून असल्याचे तसेच आतील आलमा-या फोडून त्यातील सामान फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती क्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम यांना दिली. त्यांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी याबाबतची माहिती सावली पोलीस ठाण्याला दिली.
दरम्यान सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे ठेवलेली टिनाची पेटीचे कुलूप फोडून त्यातील भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनीयम अन्वये सन २०२० मध्ये केलेल्या कारवाईनुसार वाघशिकार प्रकरणी जप्त असलेला नखांसहित असलेला वाघाचा पंजा व दुसऱ्या रूममध्ये ठेवलेला एलीफंट टार्च गायब दिसला. पोलीस व वनविभागाने पंचनामा करून वनपरिक्षेत्र अधिकारी राजूरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. क्षेत्र सहायकाचे निवासस्थान व कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने किचन चे सर्व साहित्य येथे उपलब्ध होते. चोरट्यांनी तेथे चक्क स्वयंपाक बनवून जेवणही केल्याचे घटनास्थळावरील स्थितीवरून समोर आले आहे.
आरोपीच्या थुंकीचे नमुने जप्त
कार्यालयामध्ये अनेक ठिकाणी आरोपीने थुंकले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते थुंकीचे नमुने यासोबतच एका ठिकाणी फिंगरप्रिंट ही मिळाल्याची माहिती आहे.