वर्धा, भंडारासह चंद्रपुरात चोरी करणारे चोरटे एलसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:40+5:302021-07-31T04:28:40+5:30
चंद्रपूर : वर्धा, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही-नागभीड मार्गावर शुक्रवारी अटक ...
चंद्रपूर : वर्धा, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही-नागभीड मार्गावर शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ८० हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन ऊर्फ बादशा संतोष नगराळे (२४) रा. सोमनाथपुरा वॉर्ड,राजुरा, विकास अजय शर्मा (२२) रा. वडसा जि. गडचिरोली असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी मध्यरात्री राजुरा येथे व मागील आठवड्यात सावली येथे चोरी झाल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी हे चोरटे सिंदेवाही-नागभीड मार्गाने जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिंदेवाही-नागभीड मार्गावर पेट्रोलिंग सुरु केली. दरम्यान दोन इसम दुचाकीने येताना दिसले. पोलिसांना बघून त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांना पकडून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळील बॅगची झडती घेतली असता, लॅपटॉप, चार्जर, पेनड्राईव्ह, मोबाईल, काही चिल्लर रुपये आढळून आले. पोलिसांनी दुचाकीचे कागदपत्र मागितले असता, कागदपत्र आढळून आले नाही. त्याची कसून चौकशी केली असता, त्यांनी दुचाकीसह इतर साहित्य चोरी केल्याचे सांगितले. यासह वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर यासह सावली, राजुरा येथेही चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकीसह इतर मुद्देमाल असा एकूण २ लाख ८० हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, राजेंद्र खनके, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, विनोद जाधव आदींनी केली.