पथदिवे बंद असल्याने चोऱ्या वाढल्या
By admin | Published: July 3, 2016 01:03 AM2016-07-03T01:03:05+5:302016-07-03T01:03:05+5:30
शहरात रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : तक्रारी करूनही कुणी लक्ष देईना !
सिंदेवाही : शहरात रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे. मात्र अनेक रस्त्यावरील पथदिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात चोरी, गुन्हेगारीच्या घटनात वाढ झाली आहे. पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारांना गुन्हा करणे सोयीचे होत आहे. मात्र, नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने पथदिवे दुरुस्तीसाठी कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नगरात सोई-सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक नगरपंचायत प्रशासनाची आहे. सुविधा देवून त्या बदल्यात कर घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, लाखो रुपयांचा कर वसूल करणारे प्रशासन नागरिकांना सुविधा देताना आखडता हात घेत आहे. एखादा गुन्हा घडविण्यापूर्वी गुन्हेगार सावधगिरी बाळगत असतो. नेहमी अंधाराचा फायदा घेवून चोरी व अन्य घटना घडवून आणल्या जातात. मागील काही दिवसांपासून येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे चोरट्यांना मोकळे रान झाले आहे.
राजकीय पुढारी आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील दिवे बंद राहिल्यास तक्रारी करतात. या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहे. दिवाबत्ती करापोटी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, तक्रारी करूनही त्यावर उपाययोजना करावी कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वीज वितरण कंपनीकडे तक्रार केल्यास ते नगर पंचायत प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात.
चोरीच्या घटना घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, घराबाहेरील दिवे रात्रभर सुरू ठेवावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून केले जाते. मात्र, नगर पंचायत प्रशासनच पोलीस विभागाच्या आवाहनाला हरताळ फासत आहे. (शहर प्रतिनिधी)