आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:37 PM2018-07-16T23:37:38+5:302018-07-16T23:38:10+5:30
आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचा कारणावरुन श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कोरपना, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता प्रशासकीय भवनातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचा कारणावरुन श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कोरपना, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता प्रशासकीय भवनातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
आदिवासी प्रकल्प कार्यालयातअंतर्गत जिल्ह्यात २९ वसतिगृह चालविले जातात. मागील दोन वर्षांपासून प्रवेशाकरिता आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. दोन्ही तालुक्यातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थी आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी अर्ज केले. मात्र त्यांना डावलण्यात आले, असा आरोप श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. काही वसतिगृह सुरुच करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान कोरपणा, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याने पालकांसह विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. कार्यालयात संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने पालकांनी प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवल्याने १३ जुलैला आंदोलन करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र रविवारी त्यांना वसतिगृहाबाहेर ठेवण्यात आले, असा आरोप अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे विद्यार्थी कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते.
आदिवासी वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे विद्यार्थी या प्रक्रियेला सामोर जातात त्यांना मेरिटनुसार प्रवेश दिला जातो. कोरपना-जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची प्रशासनाला जाणीव आहे. मंगळवारी वसतिगृहाची अंतिम यादी प्रकाशित होईल. त्यानंतरच प्रवेशाची समस्या सुटू शकेल.
- केशव बावणकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी