आमरण उपोषणाचा तिसरा दिवस
By admin | Published: August 24, 2014 11:23 PM2014-08-24T23:23:10+5:302014-08-24T23:23:10+5:30
येथील ग्रामपपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्याच्या मागणीकरिता गांधी चौक येथे घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी
घुग्घुस : येथील ग्रामपपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्याच्या मागणीकरिता गांधी चौक येथे घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्या प्रभाकर चिकनकर यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी स्थानिक प्राथमिक केंद्रात दाखल केले.उपोषणादरम्यान तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या रामेश्वर हिक्ररे, अनिल बांदूरकर यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच आहे.
घुग्घुस गावाची लोकसंख्या व भौगोलिक, औद्योगिक क्षेत्र लक्षात घेऊन घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्याची मागणी गेल्या बारा-पंधरा वर्षापासून सातत्याने होत आहे आणि या क्षेत्राचे आजी माजी आमदार- खासदार राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांकडून वेळोवेळी आश्वासन मिळत असले तरी घुग्घुस गावाला नगर पालिका देण्यात आली नाही. शासनाचे सर्व निकष बाजूला सारुन घुग्घुस नगर पालिकेला वगळून शासनाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगर पंचायत तर एका नगर पालिकाची घोषणा केली. हा अन्यायकारक प्रकार असल्याने घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीद्वारे रस्ता रोको, घुग्घुस बंदचे यशस्वी आंदोलनानंतर घुग्घुस गांधी चौकात २२ आॅगस्टपासून आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. उपोषणाला माजी ग्रा.पं. सदस्य रामेश्वर हिकरे, प्रभाकर चिकनकर तथा अनिल बांदुरकर बसले आहे. आंदोलनाला आरपीआय, बसपा, शिवसेना व मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान २३ आॅगस्टला अचानक समितीचे सचिव इबादुल हसन सिद्दीकी यांनी दुपारी एका मोबाईल टावरवर चढून याच मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने सहा तास विरुगिरी केली. आज उपोषणकर्ता प्रभाकर चिकनकर यांची प्रकृती खालावली असता पोलिसांनी त्याला दवाखान्यात हलविले. विशेष म्हणजे, हे आंदोलन नागरिकाचे असून कोत्याही राजकीय पक्षाचे नाही. (वार्ताहर)