तिसऱ्या दिवशीही कोळशाचे उत्पादन ठप्पच
By admin | Published: March 4, 2017 12:36 AM2017-03-04T00:36:37+5:302017-03-04T00:36:37+5:30
वेकोलि माजरी प्रशासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करुन गेल्या दोन वर्षापासून उत्पादन घेणे सुरू केले आहे.
महाप्रबंधकांनी आंदोलनस्थळी घेतली बैठक : मरू पण जागेवरून हटणार नाही!
माजरी : वेकोलि माजरी प्रशासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करुन गेल्या दोन वर्षापासून उत्पादन घेणे सुरू केले आहे. यात जवळजवळ १२० प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी खदाण बंद करीत आंदोलन पुकारले. आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. लागोपाठ तीन दिवस उत्पादन ठप्प असल्याने वेकोलिला १५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी वेकोलिचे महाप्रबंधक सत्येंद्र पाण्डेय यांनी आंदोलनस्थळी बैठक घेतली. यावेळी नियोजन अधिकारी मुजाहीदीन, शर्मा कार्मिक प्रबंधक त्रिपाटी, प्रहारचे नेता अमोल डूकरे, प्रकल्पग्रस्त निलेश ढवस, संदीप झाडे, गोकुल डोंगे, रामू डांगे, वेकोलि कामगार संघटनेचे एम. एम. माकोडे, सी.एच. राहागंडाले, दीपक डोंगरवार, आर.के. राय, धरमपाल, संजय दुबे व सर्वच प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी महाप्रबंधक सत्येंद्र पांण्डेय यांनी १४ मार्च २०१७ पर्यंत दहा जणांना नोकरीचे आदेश देतो व उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तीन महिन्यात नोकरीचे आदेश देवू असा प्रस्ताव ठेवला. यावर प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनस्थळावर सर्वच प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश दिल्याशिवाय ही नागलोन ओपनकास्ट खदान २ सुरु होवू देणार नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी नरेंद्र जीवतोडे, अंकुश आगलावे, जि.प. सदस्य प्रविण सूर हेसुद्धा बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
आंदोलनस्थळावरच मरण येईल तरी बेहत्तर; पण आम्ही येथून हटणार नाही, असे प्रकल्पग्रस्तांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
तीन ठिकाणी वेगवेगळ्या बैठका सुरु
काल प्रकल्पग्रस्तांनी प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन निवेदन दिले असता बच्चू कडू यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांनी भद्रावती विश्रामगृहात बैठक लावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाही तोडगा निघाला नाही. तसेच दुसरी बैठक वेकोलि माजरीच्या महाप्रबंधक कार्यालयात झाली. कुचना येथे प्रकल्पग्रस्तांना चर्चा करण्याकरिता बैठक बोलावली होती. पण प्रकल्पग्रस्त नोकरीचे आदेश मिळाल्याशिवाय काही ऐकायला तयार नाही. तसेच भाजपाचे अंकुश आगलावे, नरेंद्र जिवतोडे, जि.प. सदस्य प्रविण सूर यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्याशी संपर्क करुन प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली. यावर केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी दूरध्वनी व जिल्हाधिकारी व वेकोलि नागपूरच्या निदेशकांशी चर्चा करुन तात्काळ नोकरीचे आदेश देण्यास कळविले. या आंदोलनामुळे वेकोलि अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून आता या प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकीरचे आदेश दिल्याशिवाय पर्याय दिसत नाही. हे काम बंद आंदोलन परिसरात चांगलेच तापत असून प्रकल्पग्रस्त काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.वकोलिच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केली आहे, हे विशेष.