यवतमाळ जिल्ह्यातील पाण्याने भागते चंद्रपूर जिल्ह्याची तहान
By admin | Published: June 1, 2016 01:13 AM2016-06-01T01:13:15+5:302016-06-01T01:13:15+5:30
चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते.
बेंबळा धरणाचे पाणी सोडले : उद्योगांनाही लाभ
प्रवीण खिरटकर वरोरा
चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते. मात्र उन्हाळा सुरु होताच वर्धा नदीची धार आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर विसंबुन असणाऱ्या गावांत पाणी टंचाई निर्माण झाली. उन्हाळ्यात पाणी देणारे वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने तिथून पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळले नाही. अखेरीस यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळ धरणातून वर्धा नदीला ३० दलघमी पाणी सोडण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ नळ योजना भर उन्हाळ्यात कार्यान्वीत झाल्या आहेत. या पाण्याचा उद्योगांनाही लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा नदी एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर वाहत आहे. वर्धा नदीच्या काठावर अनेक गावे वसली असल्याने त्या गावातील नागरिक वर्धा नदीच्या पाण्यावर विसंबून राहत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शहरांना वर्धा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ नळ योजना व ५६ संस्था नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्याची चाहुल लागताच वर्धा नदीची धार आटली. सूर्य आग ओकत असताना वर्धा नदीची धार पूर्णत: आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या.
प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्धा नदीत पाणी सोडण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील धरणाचा आढावा घेतला. वर्धा जिल्ह्यातील धरणात कमी पाणी साठा असल्याने तेथील प्रशासनाने लाल व पोथरा धरणातून कॅनलद्वारे पाणी चंद्रपूर जिल्ह्यात सोडून ते वर्धा नदीच्या पात्रात सोडण्याची योजना आखली. कॅनलमधून पाणी येत असताना उष्ण तापमानाने पाणी पाहिजे त्या प्रमाणात वाहत नव्हते. त्यामुळे सदर योजनेतून वर्धा नदीच्या पात्रातून पाणी येणे शक्य नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणाची पाहणी करून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला बेंबळ धरणातून वर्धा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचा विचार करून व चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती विचारात घेता यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तातडीने वर्धा नदीत ३० दलघमी पाणी नुकतेच सोडले आहे. सध्या वर्धा नदीच्या दोन्ही पात्रातून पाणी वाहत असल्याने याचा फायदा यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे. उन्हाळ्यात यवतमाळ जिल्ह्याचे चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवून शेजारी धर्म पाळला असल्याने दिसून येत आहे.
पाठपुराव्याचा ध्यास व परिणाम
वर्धा नदीत प्रारंभी वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडून चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवावी, अशी आग्रही भूमीका उन्हाळ्याच्या प्रारंभी आ. बाळू धानोरकर यांनी घेतली होती. वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणातून वर्धा नदीत पाणी सोडावे, याकरिता आ. धोनोरकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याने वर्धा नदीमध्ये धरणातील पाणी सोडण्यात आले आहे.