दुषित पाण्याने भागते तहान
By admin | Published: January 12, 2015 10:46 PM2015-01-12T22:46:35+5:302015-01-12T22:46:35+5:30
दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा
२२० पाणी नमूने दुषित : पाणीपुरवठा योजनांवर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर : दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वीत झालेल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी तपासणीत जिल्ह्यातील २२० पाणी नमुने दुषित आढळले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर प्रश्ननिर्माण झाले असून दुषित पाण्यावरच नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे.
गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थाची असते. अनेक गावात नळ पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक हातपंप व विहीरींच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागत आहे. या पाणी स्त्रोतांची देखभाल व दुरुस्ती संबधीत ग्रामपंचायत, नगर पालिका व मनपा प्रशासनाची आहे. पाणी वाटपात उद्भवत असलेल्या समस्या दूर करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे.
मात्र, पाणीपुरवठ्यात येत असलेल्या विविध अडचणींमुळे अनेक गावात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हगवण, गॅस्ट्रो, साथीचे आजार पसरले आहेत. चार दिवसांपूर्वीच मूल तालुक्यातील ताडाळा येथील १५ जणांना दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याने उपचारासाठी मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नळाची पाईपलाईन लिकेज होऊन दुषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गॅस्ट्रोची लागण झाल्याचे ग्रामसेवकाने म्हटले होते.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग पाणीपुरवठा योजनांवर संनियंत्रणाचे काम करते. दर महिन्याला पाणी नमूने घेऊन दुषित पाणी आढळल्यास त्यांना उपाययोजना करण्याचे सूचित केले जाते. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठा व शुद्धीकरणासंबधी उपाययोजना करतात. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आॅक्टोंबर २०१४ मध्ये १५ तालुक्यात २ हजार २८१ पाणी नमुन्याची तपासणी केली. यात १४० नमुने दुषित आढळले. नोव्हेंबर महिन्यात २ हजार ४६२ नमुन्यांची तपासणी केली असता, २१८ नमुने दुषित आढळले. तर डिसेंबर महिन्यात घेतलेल्या ३ हजार ९७ नमुन्यांपैकी २२० नमुने दुषित आढळले आहेत. या दुषित पाण्याची टक्केवारी ७.१० एवढी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)