नाल्यातील पाण्यावर भागते तहान!
By admin | Published: January 17, 2015 02:00 AM2015-01-17T02:00:00+5:302015-01-17T02:00:00+5:30
एकीकडे बाटलीबंद पाण्याची संस्कृती पुढे येत असताना दुसरीकडे पहाडावरील मच्छीगुडा, घोडणकप्पी कोलामगुडा, पाटागुडा (पाटण), खडकी, चलपतगुड्यातील कोलामांना दुषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
शंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवती
एकीकडे बाटलीबंद पाण्याची संस्कृती पुढे येत असताना दुसरीकडे पहाडावरील मच्छीगुडा, घोडणकप्पी कोलामगुडा, पाटागुडा (पाटण), खडकी, चलपतगुड्यातील कोलामांना दुषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
आंध्र-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या जिवती तालुक्यातील गावे पहाडी व दुर्गम भागात वसल्याने मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रत्यक्षात जिवती तालुक्यातील गाव-गुड्याची स्थिती भयावह आहे. जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावात विकासाची गंगा पोहोचली नाही. इतर गावांच्या तुलनेत खडकीतील कोलामाची स्थिती अत्यंत दयनिय आहे. गावात जाण्यास रस्ता नाही, आरोग्य, पाण्याची सोय नाही. ही त्यांची स्थिती प्रत्यक्ष गाव बघितल्यावरच कळेल.
मच्छीगुडा, घोडणकप्पी, चलपतगुड्याचीही स्थिती याहून वेगळी नाही. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही योजना राबविली नाही. काही गावातयोजना राबविली आहे. मात्र तीही पूर्ण झालेली नाही.
आजही कोलामांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. झऱ्यातील गाळ काढणे आणि त्याच पाण्यावर तहान भागवणे हा नित्यक्रम त्यांचा आहे. पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे साथीच्या आजारामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. जवळपास आरोग्य सुविधा नसल्याने प्राथमिक उपचार होत नाही. त्यामुळे अनेकांचा जिव सुद्धा गमवावा लागत आहे. पाण्याचा प्रश्न आणि मुलभूत सोयीसुविधांच्या अभावाला कंटाळून काही नागरिकांनी खडकी, चलपतगुडा सोडला आहे. अनेक कोलामांनी सोयीच्या ठिकाणी स्थायी झाले आहे. अशीच स्थिती राहिल्यास गावचे गाव स्थलांतरीत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुलभुत सुविधा नसल्याने येथील विकास खुंटला आहे. ग्रामस्थांमध्ये धडपड करण्याची क्षमता आहे पण सुविधांअभावी त्यांचे जगणे कठिण होत आहे.