सौरऊर्जा दिवाबत्तीचे वाजले तेरा; कित्येक गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:36+5:302021-09-08T04:33:36+5:30
पिंपळगाव : ग्रामीण भागातील जनतेला नेहमी विजेच्या लपंडावाच्या समस्येला सामारे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने लाखो ...
पिंपळगाव : ग्रामीण भागातील जनतेला नेहमी विजेच्या लपंडावाच्या समस्येला सामारे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने लाखो रुपये खर्च करून, ग्रामीण भागात सौरऊर्जा दिवाबत्ती खासगी कंपनीला कंत्राट देऊन कार्यान्वित केली. मात्र, अल्पावधीतच सौरदिवे बंद पडले. शासनाच्या लाखो रुपयांना चुना लागून, कित्येक गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून, योजनेचे तेरा वाजले असल्याचे वास्तव आहे.
रात्रीला ग्रामीण जनतेला ये-जा करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विद्युत दिवे गावात आहेत, परंतु वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने समस्येत भरच पडते. ही समस्या दूर करण्यासाठी सौरऊर्जावर प्रकाशमान होणारे पथदिवे तालुक्यातील काही गावांमध्ये बसविण्यात आले. यासाठी खासगी कंपनीला सौरदिवे लावून काही वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती व नियम अटींसह लाखो रुपयांचे कंत्राट दिले गेले. सुरुवातीला काही दिवस वीजपुरवठा खंडित झाल्यावर सौरदिवे प्रकाशमान व्हायचे, परंतु अल्पावधितच सौरदिव्यांनी प्रकाश देणे बंद केले. आता पुन्हा समस्या जैसे थेच आहे. यामध्ये शासनाचा खर्च झाला. मात्र, समस्या सुटली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.