ग्रामीण भागात हगणदारीमुक्तीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:01+5:302021-07-26T04:26:01+5:30
मूल : निर्मल ग्राम योजने अंतर्गत मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीतील १११ गावात रोगराईला आळा बसावा व विविध आजाराचा ...
मूल : निर्मल ग्राम योजने अंतर्गत मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीतील १११ गावात रोगराईला आळा बसावा व विविध आजाराचा शिरकाव होऊ नये यासाठी घरोघरी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देत शौचालये बांधण्यात आली. यामुळे कुणीही बाहेर शौचास जाणार नाही, असे अपेक्षित होते. गावे हगणदारीमुक्त होतील या आशेने प्रशासनानेही मोठा गाजावाजा केला. मात्र या मोहिमेला ग्रामीण भागात गालबोट लागले असून शौचालयाचा वापर शेणाच्या गोवऱ्या भरण्यासाठी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच मूठमाती मिळत आहे. ग्रामीण भागात हगणदारीमुक्त गाव योजनेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागात विविध आजार वाढविण्यासाठी गावातील अस्वच्छता कारणीभूत आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात भररस्त्यावर लोक शौचास बसतात. त्यामुळे विविध आजाराचा सामना करावा लागतो. हे हेरून शासनाने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले. मात्र आजही ग्रामीण भागात गावाच्या सुरुवातील व शेवटच्या मुख्य रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून निर्मल ग्राम मोहीम राबविली. लाखो रुपयांची बक्षीसही गावांना दिली गेली. मात्र बक्षीसपात्र गावातही चित्र वेगळे नाही. शौचालयाचा वापर शेणाच्या गोवऱ्या ठेवण्यासाठी होत असल्याने मूळ उद्देशाने बगल दिल्याचे दिसून येते. निर्मल ग्राम योजनेलाच मूल तालुक्यात सुरुंग लागल्याचे चित्र आहे. याबाबत स्थानिक प्रशासनही गंभीर नाही.