पारंपरिक धानपट्ट्यात यंदा पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 08:00 AM2023-05-19T08:00:00+5:302023-05-19T08:00:02+5:30
Chandrapur News धान उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थचक्र दरवर्षी बिघडत आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या पाठबळाने काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी सुरू केली आहे.
राजेश मडावी
चंद्रपूर : मूल तालुक्यातील शेतकरी धान उत्पादनात अग्रेसर आहे; मात्र धान रोवणी व उत्पादनातील कमालीची तफावत शिवाय मिळणारा अल्पदर यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थचक्र दरवर्षी बिघडत आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या पाठबळाने काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी सुरू केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात दरवर्षी विक्रमी धान उत्पादन होते. धान पिकांतही अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन बियाण्यांचा वापर करून जादा उत्पादनाची कास धरली. मात्र, धानाचा प्रति क्विंटल दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे केवळ पारंपरिक धानाची शेती शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन मूल तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना यंदा केळी लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी गावागावांत बैठकाही घेतल्या. परिणामी चिरोली, टेकाडी, राजोली आदी गावांतील शेतकऱ्यांनी केवळी लागवडीची तयारी दर्शविली. अन्य गावांनीही पुढाकार घेतला. मूल तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यामध्ये २४ हजार हेक्टरवर भात शेती होते. कपाशी व सोयाबिन लागडीचे प्रमाण तर अत्यल्प आहे.
शेतकऱ्यांना मिळणार अर्थसाहाय्य
मूल तालुक्यात सिंचनाची मुबलकता असल्याने कृषी विभागाने केळी लागवडीचा पर्याय शेतकऱ्यांना सुचविला. धान उत्पादक शेतकऱ्यांची सकारात्मक मानसिकता तयार झाल्याने केळीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. एमआरजीएस अंतर्गत केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख ५३ हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
मका लागवड प्रयोग यशस्वी
मूल तालुक्यात कांदा लागवड क्षेत्रही वाढले. कांदा चाळ तयार झाली. मका लागवडीचे क्षेत्र ५०० हेक्टरच्या पुढे गेले. आर्थिक प्रगतीसाठी या तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीचा परीघ ओलांडू लागल्याचे चित्र अन्य तालुक्यांसाठीही प्रेरक ठरावे.
धानपिकासाठी प्रसिद्ध मूल तालुक्यात यंदाच्या हंगामात नगदी पीक असणाऱ्या केळी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले. त्यादृष्टीने गावागावांत बैठक घेतल्या. या पिकासाठी शेतकरी सकारात्मक आहेत. पहिल्या टप्प्यात ५० ते १०० हेक्टरवर केळी लागवड होईल, अशी तयारी आहे.
-भास्कर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, मूल