यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव; मंडळांचा उत्साह शिगेला, देखाव्यांची जोरदार तयारी
By राजेश मडावी | Published: August 30, 2022 04:03 PM2022-08-30T16:03:51+5:302022-08-30T16:04:58+5:30
जिल्ह्यात साडेपाच हजार पोलीस तैनात
चंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र, कोरोना ओसरल्याने यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होणार असून, बुधवारी घराघरांत बाप्पाचे आगमन होणार आहे. देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
बाप्पाची मूर्ती खरेदीसाठी मंगळवारी चंद्रपुरातील आझाद गार्डन परिसरात भाविकांनी मंगळवारी प्रचंड गर्दी केली. सर्व तालुक्यांत असेच चित्र होते. निर्बंध उठल्याने पुढील दहा दिवस नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा व्हावा, यासाठी जिल्ह्यात साडेपाच हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे.
गणेश मंडळांची संख्या वाढली
कोरोनापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजारपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा व्हायचा. कोरोनामुळे मंडळांची संख्या घटली होती. यंदा पुन्हा वाढली. वाॅर्डावाॅर्डांत गणेश मंडळे उदयास आली. निर्बंध नसल्याने प्रत्येक वाॅर्डात बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी तरुणाई सरसावली. मंडप व प्रबोधनात्मक देखावे उभारण्याची लगबग सुरू आहे.
४ फुटांच्या मूर्तीची मर्यादा उठविली
गतवर्षी सार्वजनिक मंडळांना ४ फूट व घरगुती गणपती मूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा देण्यात आली. गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांनाही मनाई होती. यंदाचे चित्र उत्साहवर्धक असून, प्रशासनाने ४ फुटांच्या मूर्तीची मर्यादा उठवली आहे.
गोल बाजारात गर्दी उसळली
पूजा व सजावटीचे साहित्य, मखर, तोरण, विद्युत माळा आदी खरेदीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांत गर्दी झाली. सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री, पेढे, मोदक आदी साहित्य खरेदीसाठी मंगळवारी चंद्रपुरातील गोल बाजारात प्रचंड गर्दी उसळली.