‘त्या’ ६५२ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:53 PM2018-07-22T22:53:33+5:302018-07-22T22:54:44+5:30
जिल्हा अंतर्गत बदली करण्यासाठी जि. प. शिक्षकांनी सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याच्या संशयावरून विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील एकुण ६५२ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तातडीने चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे यांनी शनिवारी दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा अंतर्गत बदली करण्यासाठी जि. प. शिक्षकांनी सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याच्या संशयावरून विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील एकुण ६५२ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तातडीने चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे यांनी शनिवारी दिले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून कार्यवाहीसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ पासून जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरण लागू केले. मात्र यातील तरतुदींना बगल देऊन जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आॅनलाईन बदलीचा लाभ घेतला. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ‘त्या’ वादग्रस्त शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली. या तपासणी प्रक्रियेत वर्षानुवर्षे शिक्षण विभागातच कार्य करणाºयांचा सहभाग आहे. त्यामुळे या कथित तपासणी मोहिमेवर अन्यायग्रस्त शिक्षकांनी नाराजी दर्शविली आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात शनिवारी केवळ सात शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे पत्र संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार ही तपासणी पार पडली. परंतु, तपासणीच्या स्वरुपाबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. या प्रक्रियेत सहभागी झालेले उपशिक्षणाधिकारी किशोर काळे यांना विचारले असता, प्रमाणपत्रांची तपासणी झाली हे खरे आहे. शिक्षक बदली संदर्भातील नऊ तक्रारी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आल्या. त्यावर सोमवारी सुनावनी असल्याचेही त्यांनी सांगितले. तर शिक्षणाधिकारी लोखंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान जि.प. शिक्षक बदली प्रकरणात रविवारी ‘लोकमत’ने ‘सात शिक्षकांचीच चौकशी अन्य प्रमाणपत्रांवर मेहरनजर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश देत संवर्ग भाग १ मधील ३१६ व संवर्ग भाग २ मधील २५६ अशा ६५२ शिक्षकांच्या प्रमाणपत्र तपासणीचे आदेश दिले आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत: प्रमाणपत्रांची तपासणी करायची असून ही तपासणी अत्यंत गंभीरपणे करावी. अनेक न्यायालयीन प्रकरणे सुरू असल्याने तपासणीत चुका राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा गंभीर दखल घेऊन आपणावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. प्रकरणाचा तपासणी अहवाल शिफारशीसह ३१ जुलैपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयास न चुकता सादर करावा, असे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथ.) लोखंडे यांनी दिले आहे. यामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
अशी असावी कागदपत्र पडताळणी समिती
जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीमध्ये बनावट कागदपत्र प्रकरण उघडकीस येत आहेत. यापैकी नऊ प्रकरणे विभागीय आयुक्तांकडे पोहोचली. मात्र चंद्रपूर जि.प.ने कागदपत्र पडताळणी समिती गठित केली नाही. काही शिक्षकांचा बोगसपणा उघडकीस आल्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्हा परिषदांनी सहा सदस्यांच्या समितीकडे ही विशेष जबाबदारी सोपविली आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (अध्यक्ष), जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अधिकारी (बांधकाम), आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ (अंतर तपासणीसाठी), शिक्षणाधिकारी (सचिव) आदींचा समितीत समावेश आहे. त्यामुळे चंद्रपूर जि.प.ने समिती गठित न करण्याचे कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वतंत्र समिती गठित करा
जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली प्रकरणात बनावट प्रमाणपत्र सादर करुन आवडत्या ठिकाणी बदली अथवा बदलीतून सूट मिळविणाºया शिक्षकांच्या कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून शनिवारपासून चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणात केवळ शिक्षण विभागावरच अवलंबून
ब्रह्मपुरी, भद्रावतीत १२३ तक्रारी
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व दोन मध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तसेच पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत तीन किमी अंतराची खोटी माहिती दिल्याप्रकरणी ब्रह्मपुरी तालुक्यात ७१ आणि भद्रावती पंचायत समितीमध्ये ५२ तक्रारी करण्यात आल्या. यावरही सुनावणी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
चिमूर पं.स. मध्ये आज तपासणी
बनावट प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे सादर करुन बदली केल्याप्रकरणी चिमूर पं.स. अंतर्गत ४२ शिक्षकांच्या कागदपत्रांची सोमवारी सकाळी ११ वाजता गटसाधन केंद्रात तपासणी होणार आहे. मूळ कागदपत्रे व आॅनलाईन बदली अर्जाच्या झेरॉक्स प्रती घेऊन उपस्थित राहण्याचे निर्देश संबंधीत शिक्षक व केंद्रप्रमुखांना देण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारीच ही तपासणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.