आकाशातून कोसळलेले ‘ते’ तुकडे चिनी उपग्रहाचे; अखेर इस्रोचे शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 08:07 PM2023-04-05T20:07:43+5:302023-04-05T20:08:19+5:30
Chandrapur News वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी परिसर व विविध वेगवेगळ्या ठिकाणी अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाइटचे तुकडे असल्याचे इस्रो व अमेरिकेच्या ऑबझर्व्हेटरीने शिक्कामोर्तब केले.
चंद्रपूर : वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी परिसर व विविध वेगवेगळ्या ठिकाणी अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाइटचे तुकडे असल्याचे इस्रो व अमेरिकेच्या ऑबझर्व्हेटरीने शिक्कामोर्तब केले. इस्रोने याबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपविला आहे. २ एप्रिल २०२२ रोजी उघडकीस आलेल्या या घटनेला एक वर्षाचा कालावधी झाला आहे.
राज्याच्या विविध भागात आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात २ एप्रिल २०२२ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एक मोठी रिंग व फुटबॉलच्या आकाराचा सिलिंडर अवकाशातून कोसळला होता. या घटनेला अनेकांनी कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केल्याने मोठी चर्चा झाली होती. लाडबोरी येथे रिंग व सिलिंडर कोसळल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच त्यांनी गावात जाऊन घटनेची पाहणी करून अवकाशातून कोसळलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. पोलिस ठाण्यात त्याच रात्री जमा करण्यात आल्या. त्यानंतर त्याच रात्री कोसळलेले फुटबॉलच्या आकाराचे सिलिंडर ब्रम्हपुरी, चिमूर व सिंदेवाहीच्या अनेक भागात आढळून आले. त्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. या घटनेची दहशत निर्माण झाल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व स्कायवॉच ग्रुपचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी इस्रोकडे याबाबत चौकशीची मागणी केली होती. १५ एप्रिल २०२२ रोजी इस्रोचे दोन वैज्ञानिक एम. शहाजहान, मयुरेश शेट्टी व प्रा. सुरेश चोपणे यांनी लाडबोरी गावाची पाहणी व नागरिकांशी चर्चा केली. सिंदेवाही पोलिस ठाण्यात ठेवलेल्या त्या वस्तूंचे निरीक्षण करून त्या अवकाशी वस्तू निरीक्षणाकरिता पाठविण्यात आल्या होत्या.
काय आहे निष्कर्ष?
इस्रोने त्या अवकाशीय वस्तूंचे निरीक्षण केले असता चीनच्या लाँगमार्च सॅटेलाइटचे ते तुकडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. चीनने लाँगमार्च हा उपग्रह अवकाशात सोडला होता. हा उपग्रह बंगालच्या खाडीत पडणे अपेक्षित होते, असा अंदाज असताना उपग्रहाचे तुकडे समुद्रात न पडता विविध देशांसह महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात कोसळले.
नासाच्या ऑब्झर्व्हेटरीचे शास्त्रज्ञ जॉन्सॉन मॅक्डेएल यांनी व इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, चंद्रपूर व अन्य ठिकाणी कोसळलेल्या अवकाशीय वस्तू चीनच्या लाँगमार्च उपग्रहाचेच तुकडे आहेत. याबाबत जॉन्सॉन मॅक्डेएल यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे भारत सरकार भविष्यात या घटनेबाबत कार्यवाही करते, याकडे लक्ष आहे.
- प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक, स्कायवॉच ग्रुप, चंद्रपूर