तलावाच्या मागणीसाठी भटारीवासीयांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 12:46 AM2017-01-08T00:46:29+5:302017-01-08T00:46:29+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील भटारी वनग्रामातील कक्ष क्र. १०७ येथे तलावाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन प्रशासकीय मंजुरी दिली.
तलाव फक्त कागदावर : ३६ वर्षांपूर्वी प्रशासकीय मंजुरी
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील भटारी वनग्रामातील कक्ष क्र. १०७ येथे तलावाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन प्रशासकीय मंजुरी दिली. मात्र, या तलावाचे बांधकाम ३६ वर्षांनंतरही सुरू न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सूरज गोरंतवार यांच्या नेतृत्त्वात भटारीवासीयानी पोंभुर्णा तहसील कार्यालयासमोर शनिवारी ठिय्या आंदोलन केले. शेकडोच्या संख्येने आलेल्या भटारीवासीयांनी पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या कामचुकार धोरणाच्या आंदोलन केले.
वनग्राम भटारी येथील शेतकऱ्यांच्या शेतीकरिता पाण्याची समस्या जाणून जिल्हा परिषदेने १२ नोव्हेंंबर १९८० रोजी ठराव क्र. ९ नुसार प्रशासकीय मंजुरी दिली. त्या अनुषंगाने त्यांचे सीमांकन झाले. मात्र तलावाचे काम अजूनही सुरू झाले नाही. भटारी येथील राखीव वनक्षेत्र कक्ष क्र. १०७ मधील तलाव बांधकामाकरिता ३८.२० हेक्टर जमीन भूसंपादन करायची होती. त्याकरिता गैर वनक्षेत्राची महसूल विभागाच्या अधीनस्त ७६.४० जमीन वन विभागाला द्यायवयाची होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ७६.४० हेक्टर जमिनीपैकी ७१.४१ हेक्टर जमीन योग्य असल्याचे व ४.९९ हेक्टर जमीन अयोग्य असून अतिक्रमण असल्याचे कळविण्यात आले.
२००५ मध्ये राजुरा परिक्षेत्रातील महसूल विभागाच्या ताब्यातील ‘परमपोक’ क्षेत्र ही अतिक्रमण असल्याचे कळविले. शिवाय लघु सिंचन विभागाने भटारी येथील प्रास्तावित तलावाचे सुधारित अंदाजपत्रक १ कोटी ५२ लाख ४८ हजार ७४६ रुपये असल्याने व सिंचन तलावाकरिता शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडात बसत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन गोंडपिंपरी उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तलावाचा वन प्रस्ताव रद्द करण्याबाबत कळवून मोकळे झाले. महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या सर्वांगिण विकासाकरिता कायद्याची अंमलबजावणी केली खरी असली तरी १०० टक्के आदिवासी गाव असलेल्या भटारी गावाला दुजाभाव सहन करावा लागत आहे.
या आंदोलनात सुरज गोरंतवार, रमेश वेलादी, मारोती पेंदोर, देविदास पेंदोर, बापूजी शेडमाके, वासुदेव पेंदोरे, पितांबर पेंदोर, प्रभाकर कुसराम, श्रावण पेंदोर, श्रीहरी पेंदोर, मारोती कोवे, सोमाजी शेडमाके, तुळशीराम पेंदोर, रघुनाथ कोडापे, उषा आलाम, सुवर्णा पेंदोर, मंगला कन्नाके, कवडू कुंदावार, गिरीधरसिंह बैस, रुषी हेपट यांचेसह शेकडो भटारीवासी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)
रोजगारासाठी
आंध्र प्रदेशची वाट
भटारीतील लोकसंख्या ८५० च्या वर आहे. या गावात शेतीची पुरेसी सोय नाही. तसेच रोजगार नसल्याने २०० पेक्षा अधिक तरुण, वृद्ध, महिला पोट भरणाच्या निमित्ताने आंध ्रप्रदेशात जात आहेत. भटारी ग्राम विकास कृती समितीच्या वतीने शेकडो महिला, पुरुषांनी, आबाल- वृद्धांनी पोंभुर्णा तहसील कार्यालय परिसरात ठिय्या देवून मागणीच्या संबंधाने तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन सादर केले.