संघभूमीला हजारो धम्मबांधवांचे वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:42+5:30
सम्राट अशोकाच्या काळापासून बौद्ध भिक्खूू व उपासक उपासिकांच्या साधना अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या या साधनाभूमीत मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक -उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो धम्मबांधवांचे थवे दाखल झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंध:कारातून युगप्रवर्तकाने ज्ञानाच्या प्रकाशात आणले. ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी 'मूकनायक ' हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्रामाची सुरुवात केली होती. पिढयानपिढया आंधळ्या असणाऱ्या समाजाला समतेचा सूर्य दाखविला. याच दिनाच्या ९९ व्या वर्षपूर्तीनिमित्त ३१ व ३१ जानेवारीला तपोभूमी संघराम गिरी येथे या धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील धम्म बांधवानी या ऐतिहासिक भूमीत येऊन वंदन केले.
सम्राट अशोकाच्या काळापासून बौद्ध भिक्खूू व उपासक उपासिकांच्या साधना अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या या साधनाभूमीत मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक -उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो धम्मबांधवांचे थवे दाखल झाले होते. बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. रात्रभर बौद्ध अनुयायी मुक्कामी होते. महास्थावीर भदंत ज्ञानज्योती यांनी अष्ठशील वंदन केले. याप्रसंगी मंचावर समारंभाचे अध्यक्ष महास्थविर शिलानंद व देश-विदेशातील भिक्खू उपस्थित होते.
विपश्यनेतून मानवी जीवनाचे कल्याण - महास्थवीर शिलानंद
समग्र मानव जातीचे कल्याण भगवान बुद्धांच्या धम्म आचरणातून होते व त्रिशरण, पंचशील अंगिकारून एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होते. तथागतांच्या प्रणालीनुसार विपश्यना करून आपल्याला स्वत: वर नियंत्रण मिळविता येत असून अनुयायांनी विपश्यनेत सामील व्हावे, विपश्यना ही मानवी जीवनाचे कल्याण करणारी महत्त्वाची प्रणाली आहे, असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष महास्थवीर शिलानंद धम्मबांधवाना मार्गदर्शन करताना केले.
धम्म चळवळ गतिमान करा- भदंत ज्ञानज्योती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिक्षाभूमीवरील धम्मदीक्षा समारोहातून अनुयायांना संबोधित करताना बौद्धमय भारत निर्माण करण्याचे स्वप्न बघितले होते व अनुयायांना संदेश दिला होता. त्याच स्वप्नपूर्तीसाठी तुमची जबाबदारी व समाजाप्रति असलेली जाणीव ओळखून बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी धम्म चळवळ गतिमान करा, असा संदेश भिक्खू संघ, संघरामगिरीचे संघनायक महास्थविर भदंत ज्ञानज्योती यांनी उपस्थित धम्मबांधवाना दिला.
महामंडळाच्या विशेष बसफेऱ्या
संघरामगिरीला धम्मसमारोहाकरिता उसळणारी धम्मबांधवांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चिमूर व वरोरा आगारातून संघरामगिरीसाठी विशेष बसगाडया सोडण्यात आल्या. यासह खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी रेलचेल दिवसभर होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वनविभागाच्या प्रवेशद्वारावर हजारो वाहनांची नोंद झाली होती. तर दिवसभर वाहनांची संघरामगिरीच्या मार्गाने वर्दळ कायम होती.
प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा
धम्म समारंभाकरिता येणाऱ्या धम्मबांधवांच्या सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. वन विभागाकडून सहायक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, वनकर्मचारी, वनमजुर व व्याघ्र संरक्षण दलाचे पथक तैनात केले होते. मुख्य समारंभाचे ठिकाणी पोलीस विभागाकडून ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचाऱ्यांची चमू तैनात होती.