श्रीक्षेत्र गायमुखचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन
By Admin | Published: January 15, 2017 12:46 AM2017-01-15T00:46:41+5:302017-01-15T00:46:41+5:30
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गायमुख येथे मकरसंक्रांतीनिमित्त परंपरेने चालत आलेल्या यात्रेत हजारो भाविकांनी सहभाग दर्शवून श्रीक्षेत्र गायमुखचे दर्शन घेतले.
पारंपारिक यात्रा : मकरसंक्रांतीनिमित्त उसळली गर्दी
नागभीड/तळोधी(बा) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गायमुख येथे मकरसंक्रांतीनिमित्त परंपरेने चालत आलेल्या यात्रेत हजारो भाविकांनी सहभाग दर्शवून श्रीक्षेत्र गायमुखचे दर्शन घेतले. संबंध पंचक्रोशीतील भाविक या यात्रेत सहभागी झाले होते.
एका छोट्याशा डोंगरीतून अगदी अनादी काळापासून एक पाण्याचा झरा अव्याहत वाहत असून झऱ्याच्या विसर्जन स्थळी गायीचे मुख आहे. म्हणूनच या स्थळाला गायमुख हे नाव पडले असावे. अगदी कडक उन्हाळ्यातही हा झरा अविरत वाहतच असतो. याच ठिकाणी पश्चिम मुखी मारुतीचे मंदीर असून जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. अगदी अलिकडेच या ठिकाणी दुर्गामातेच्या मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे.
जागृत स्थळ म्हणून संबंध वर्षभर भाविक या ठिकाणी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून येत असतात. तरी पण या ठिकाणी शनिवारी विशेष गर्दी राहते. मात्र मकर संक्रांतीला या ठिकाणी परंपरेने यात्रा भरत आली आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांचे विशेष आकर्षण म्हणजे गाईच्या मुखातून येणारे पाणी अगदी श्रद्धेने प्राशन करणे. या पाण्याचे योग्य नियोजनही करण्यात आले असून दोन टाक्यामध्ये हे पाणी सोडण्यात येते. यातील एका टाक्यात महिलांची व दुसऱ्या टाक्यात पुरुषांसाठी आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही या स्थळाची ख्याती असली तरी या स्थळाचे व्यवस्थापन करण्यासाठी अद्यापही ट्रस्टची निर्मिती करण्यात आली नाही.
बाळापूर येथील मोखारे परिवाराकडे या स्थळाची मालकी असल्याची माहिती आहे. त्यामुळेच की काय एव्हढ्या मोठ्या स्थळाची म्हणावी तेवढी प्रगती अद्यापही झाली नाही. मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकमत चमूने या स्थळाला भेट दिली असता हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले. अनेकांनी या ठिकाणी स्वयंपाक आणले होते. अनेक संस्था व दानशूर व्यक्तींनी महाप्रसादाचे आयोजनही केले होते. अगदी तन्मयतेने यात्रेत सहभागी झालेले भाविक गोमुखातून येणारे पारी प्राशन करून मारुतीचे व दुर्गामातेचे दर्शन घेत होते.