हजारो भाविकांनी घेतले बालाजी महाराजाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:27 PM2018-01-30T23:27:01+5:302018-01-30T23:27:55+5:30
३९० वर्षांची परंपरा असलेल्या क्रांतीनगरी चिमुरातील घोडा रथ यात्रेला २२ जानेवारीपासून सुरुवात झाली.
आॅनलाईन लोकमत
चिमूर : ३९० वर्षांची परंपरा असलेल्या क्रांतीनगरी चिमुरातील घोडा रथ यात्रेला २२ जानेवारीपासून सुरुवात झाली. प्रत्यक्षात सोमवारी रातघोड्यापासून घोडा रथयात्रेला प्रारंभ झाला. रातघोड्याच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी आराध्य दैवत बालाजी महाराजाचे दर्शन घेतले. शहरातून निघालेल्या मिरवणुकीने पंचक्रोशितील बालाजीभक्त भारावून गेले.
पेशवाईच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९१ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसलेकालीन आहे. येथे घोडा रथ यात्रेला २४६ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली आणि आजही तेवढ्याच उत्साहात यात्रा भरविली जात असल्याने बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठ्या संख्येने गर्दी करतात.
रातघोड्याच्या मिरवणुकीला सोमवारी रात्री एक वाजता भक्तिमय वातावरणात फटाक्याच्या आतषबाजीने सुरूवात करण्यात आली. ही मिरवणूक बालाजी मंदिर ते नेहरू चौक, अहिंसा चौक, बाजार ओळ, शिवाजी चौक, शहीद बालाजी रायपुरकर चौक मार्गे सकाळी साडेपाच वाजता बालाजी मंदिरात विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीत हजारो बालाजी भक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. भक्ती संगीताच्या तालावर व आतषबाजीने बालाजी भक्ताच्या डोळ्याचे पारणे फेडले, तर गोविंदा-गोविंदाच्या गजराने चिमूर क्रांतीनगरी दुमदुमली होती.
महाशिवरात्री पर्यंत चालणाऱ्या या घोडा रथ यात्रेमध्ये बालाजी मंदिराच्या आवारात आ. मितेश भांगडिया, आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्यावतीने कलकत्ता येथीत मॉकाली मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान चिमूर नगरीत मनोरजंनाची अनेक दुकाने लागली आहेत. यात्रेतील भाविकांसाठी नगर परिषद प्रशासनाने विविध सुविधा पुरवल्या असून पोलीस प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता १२५ कर्मचारी व अधिकाºयांचा बंदोबस्त लावला आहे. दोन ठिकाणी मदत केंद्र उभारले आहेत.