हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

By Admin | Published: July 14, 2016 12:58 AM2016-07-14T00:58:22+5:302016-07-14T00:58:22+5:30

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता.

Thousands of hectare under irrigation | हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

googlenewsNext

कोठारी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान
कोठारी : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदी, नाले, तलाव व बोड्या फुगल्या. त्यात इरई, वर्धा व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने अनेक नद्यांना पूर आला. त्यात कोठारी परिसरातील वर्धा नदीला पूर चढला व हजारो हेक्टर पेरणी झालेली शेती पुराच्या पाण्याखाली आली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मृग नक्षत्राच्या सरी पडताच जमीन ओली झाली. शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या पूर्वीच शेतीची योग्य मशागत करून पेरणीसाठी तयारी केली. जून महिन्याच्या मध्यंतरी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करून बाजार भावापेक्षा जास्त किमतीचे बी-बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली. बियाणांना अंकूर फुटून रोपे तयार झाली. कापूस, सोयाबीन, तूर व धान पेरणी करून तयार रोपांची डवरणीसुद्धा केली. धान पऱ्ह्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने व पावसाने विश्रांती न घेतल्याने २५ टक्के शेतकऱ्यांचे धान पऱ्हे मागे राहिले. मात्र ज्यांनी धानाचे पऱ्हे टाकले, त्यांच्या बांध्यात सतत पावसाने पाणी तुडूंब भरून उगवलेले धान पऱ्हे सडले. परिणामी यात शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. पुराच्या पाण्याखाली सतत तीन दिवस कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला असल्याने उगवलेले, डवरलेले पीक सडले आहेत. आधीच नापिकीने त्रस्त शेतकरी मागील वर्षी हैराण झाले होते. यावर्षी पाऊस उशिरा आला. परंतु सतत झड लागून राहिल्याने शेतकरी आस्मानी संकटात सापडला. पीक कर्ज, सावकारी कर्ज व खासगी कर्ज करून बियाणांची खरेदी करून पेरणी केली. मात्र निसर्गाच्या रौद्र रुपामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
वर्धा नदीच्या पुराच्या गढूळ पाण्यात कोठारी, पळसगाव, आमडी, किन्ही, कवडजई, मानोरा, इटोली, बामणी, काटवली, कुडेसावली, परसोडी, तोहोगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी व लाठी आदीसह २० ते २५ गावातील हजारो हेक्टर शेतीतील उगवलेली पीके, पेरलेले बियाणे सडून गेले आहेत.
अशात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिकाची पाहणी करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यांनी सोमवारपर्यंत मदत देण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप शासनाचे कर्मचाऱ्यांनी सर्व्हेक्षण पूर्ण केले नाही व कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Thousands of hectare under irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.