युगच्या न्यायासाठी हजारो नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:19 PM2018-09-03T23:19:49+5:302018-09-03T23:20:16+5:30
बहुचर्चित खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा गुप्तधनासाठी नरबळी घेणाऱ्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : बहुचर्चित खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा गुप्तधनासाठी नरबळी घेणाऱ्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
युग अशोक मेश्राम अमर रहे, युगच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीचे फ लक घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सोमवारी अकरा वाजता मोर्चाची सुरूवात झाली. तत्पूर्वी खंडाळा ग्रामपंचायतमध्ये युगला गावकºयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेतील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, प्रकरण अतिजलद न्यायालयात चालवावे, सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, परिसरातील सर्व मांत्रिकांना अटक करावी, आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांना सादर करण्यात आले आहे. मोर्चात खंडाळा, काहाली, कन्हाळगाव, खेड चांदली व ब्रह्मपुरी शहरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीयगृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनाही पाठविण्यात आले आहे. यावेळी खंडाळा ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र राखडे, उपसरपंच संदिप माटे, अमरदिप राखडे, जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजुकर, विनोद झोडगे, अॅड. गोविंद भेंडारकर, उपसभापती पं. स. विलास उरकुडे, विजय डेंगे, राजेश डेंगे, आशा राखडे, शालू राखुंडे व खंडाळा ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
खंडाळा गावात शुकशुकाट
युगचे आई वडिल या मोर्चात सहभागी झाले नाही. आईची प्रकृती बरी नसल्याने उपचारासाठी नागपूरला हलविल्याची माहिती गावकºयांनी दिली. युगला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी खंडाळा येथील गावकरी शेतीची कामे बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे गावात शुकशुकाट पसरला होता.