हजारों आदिवासींनी केले ठाकूरदेवांना नमन
By admin | Published: January 8, 2016 02:07 AM2016-01-08T02:07:49+5:302016-01-08T02:07:49+5:30
एटापल्ली तालुक्यात लोह खनिजाच्या साठ्यांमुळे प्रसिद्धीला आलेल्या सूरजागड पहाडीवर आदिवासींचे आराध्य दैवत ठाकूरदेवांचे देवस्थान आहे.
सूरजागड दसरा यात्रा उत्सव : छत्तीसगडसह जिल्ह्याच्या दक्षिण भागातून नागरिकांची हजेरी
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यात लोह खनिजाच्या साठ्यांमुळे प्रसिद्धीला आलेल्या सूरजागड पहाडीवर आदिवासींचे आराध्य दैवत ठाकूरदेवांचे देवस्थान आहे. येथे दरवर्षी ५ ते ७ जानेवारी या कालावधीत यात्रा उत्सव साजरा केला जातो. या यात्रेसाठी अहेरी, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा तालुक्यासह छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक सहभागी होतात.
पहिल्या दिवशी संपूर्ण सूरजागड पहाडीवर नागरिक जमा होऊन मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी पाटील, भूमिया व पुजाऱ्यांच्या नेतृत्वात पहाडीच्या पायथ्याशी मंदिरात अश्वावर विराजमान असलेल्या ठाकूरदेवाचे दर्शन घेऊन आदिवासी बांधव पहाडीवर चढाई करण्यासाठी निघतात. ५ ते ६ किमी वर चढून ठाकूरदेवांची पूजा केली जाते. काही भाविक पहाडीच्या पायथ्याशी विराजमान ठाकूरदेवाला पशु बळीही देऊन आपला नवस फेडतात. मुक्कामाच्या दरम्यान रात्रीच्या वेळी रेला नृत्य, पथनाट्य तथा जनजागृती कार्यक्रमाची मांदियाळी पहावयास मिळते. तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास म्हणून भाविक पायथ्याशी असलेल्या ठाकूरदेवाचे दर्शन घेऊन नवीन वर्ष सर्वांना सुखी व आनंदाचे जावो अशी कामना करतात व पुढील वर्षी नवस फेडण्याचे वचन देऊन यात्रेचा निरोप घेतात. यावेळी शासनाकडून यात्रेदरम्यान आरोग्य तपासणी शिबिर, कृषी प्रदर्शन तथा विविध शासकीय योजनांची माहिती देणारे दालन लावण्यात आले होते. तीन दिवशीय यात्रेत हजारो आदिवासींनी ठाकूर देवांसमोर नतमस्तक होऊन आपली कामना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)