हजारो हेक्टरवरील कपाशी आडवी

By admin | Published: September 19, 2015 01:05 AM2015-09-19T01:05:18+5:302015-09-19T01:05:18+5:30

बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस बेसुमार बरसलेल्या पावसाने जिल्ह्यातील अंदाजे २५ टक्के कपाशीचे पीक आडवे झाल्याने ...

Threads on the heights of thousands of hectares | हजारो हेक्टरवरील कपाशी आडवी

हजारो हेक्टरवरील कपाशी आडवी

Next

शेतकऱ्यांना फटका : मुसळधार पावसाने केला घात, जीवतीच्या पहाडावरील कापूस, सोयाबीन आदी पिके उद्ध्वस्त
चंद्रपूर : बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस बेसुमार बरसलेल्या पावसाने जिल्ह्यातील अंदाजे २५ टक्के कपाशीचे पीक आडवे झाल्याने कापूस पिकाच्या उत्पादनावर चांगलाच परिणाम होणार आहे. $ि$िदोन दिवस संततधार कोसळेला पाऊस हा कापसासह सर्वच पिकांसाठी पोषक असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला तरी या पावसाने कोरपना, जीवती या अतिदुर्गम तालुक्यातील हजारो हेक्टरवरील उभे कपाशीचे पीक आडवे केले. वाऱ्याचा वेग आणि पावसाची तीव्रता यामुळे कपाशीचे पीक जमिनीवर आडवे झाले. याचा सर्वाधिक फटका जीवती आणि कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातजवळपास एक लाख ४६ हजार ५५४ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चंद्रपूरसह कोरपना, जीवती, राजुरा, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, बल्लारपूर, भद्रावती, पोंभूर्णा आदी तालुक्यांमध्ये कपाशीचे पीक घेतले जाते. कापसाची पीक परिस्थिती उत्तम असताना परतीच्या पावसाने घात केला. (प्रतिनिधी)
कोरपना तालुक्यात मोठे नुकसान
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील बऱ्याच भागात शेतातील उभ्या पऱ्हाट्या कोलमडल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागातील मोठे वृक्षही मुळासकट उन्मळून रस्त्यावर पडले आहे. साधारणत: सप्टेंबर महिन्यात कपाशीचे पीक फळावर येण्याचा काळ असतो. त्यामुळे मोठी आशा ठेवून खतासह, फवारणीचा मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला. मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतामधील पाचळावर आलेली उभी झाडे जागीच आडवी झालीत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील मिरची पिकाची अवस्थाही अशीच झाली आहे. कपाशीचे झाड फळधारणेवर असताना एकदा वाकून पडल्यास ते पुन्हा उभे होत नाही. त्यामुळे आता उत्पादनाची आशा मावळली असून हजारो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांनी मोठी किंमत मोजून बि-बियाणे व खतांची खरेदी केली. यात दुबार पेरणीचा फटकाही बसला. हा भार सोसत असतानाच हाती येणारे पीक जमिनोदस्त झाल्याचे चित्र आहे. पावसाआधी एकीकडे उभी पिके पाण्यासाठी तहानलेली होती तर पाऊस आल्यानंतर हेच पीक वाकून पडली आहे. कोरपना, जीवती, राजुरा तालुक्यात कपााशीचे मोठे उत्पादन घेतले जाते. यातही कोरपना तालुक्यात ३० हजाराहून अधिक हेक्टरवर कापसाचा पेरा यावर्षी आहे. त्यामुळे नगदी पिकाची आशा बाळगून असलेला शेतकरी यामुळे निराश झाला आहे.(वार्ताहर)
खरीप हंगामाला दुहेरी संकटाचे ग्रहण
जीवती : दोन दिवस कोसळलेल्या संततधार पावसाने पहाडावर हाहाकार उडविला. पहाडावरील शेतकरी कापूस, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिके घेतात. मात्र या पावसाने या पिकांना चांगलीच क्षती पोहचली. हजारो रुपये खर्च करून पहाडावरील शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली. अगोदर कोरड्या दुष्काळाने पिके करपली तर आता ओल्या दुष्काळाने उभे पीक आडवे झाले. शासनाने या तालुक्यात नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांचे हाल आहेत.
शेतात व घरांमध्ये शिरले पाणी
कोरपना तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले. शेती जलमय झाली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने दाणादाण उडाली. कोरपना तालुक्यातील नांदा येथे श्री प्रभू रामचंद्र विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणाला गुरूवारी नदीचे स्वरूप आले होते.
पावसाने केली रस्त्याची दुर्दशा
पावसाचा फटका घरांसह अनेक रस्त्यांनाही बसला आहे. गावातील छोट्या पुलावरून पाणी गेल्याने डांबर निघून त्यावर केवळ दगड शिल्लक आहेत. त्याचबरोबर काही रस्त्यावर मोठे खड्डेदेखील पडले आहेत.
पावसातच फडकले ध्वज
कोरपना तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी सर्वत्र झेंडे फडकविण्यात आले. राजुरा मुक्ती दिनाचा स्वातंत्र्यसोहळा साजरा करण्यासाठी शाळांना शासकीय कार्यालयांना सुटी होती. सकाळी पावसाची संततधार कायम असल्याने शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयांमध्ये पावसातच ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांची संख्याही बोटावर मोजण्याईतकी होती.
पाचळ पडले गळून
पऱ्हाटीचे पीक फळावर येताना पाचळ अधिक येतो. हीच अवस्था सध्या शेतातील कपाशीची आहे. जोरदार पावसामुळे पाचळ गळून पडले असुन पुन्हा फळधारणा होईल की नाही, अशी भिती शेतकऱ्यांना आहे.
अनेक गावे राहिली अंधारात
दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागात दोन दिवस अंधारातच गावकऱ्यांना रात्र काढावी लागली. काही गावांत अद्यापही विजेचा लंपडाव सुरूच आहे.
भोयगाव पुलावर पाणी
भोयगाव - चंद्रपूर मार्गे कालपासून पावसामुळे बंद असुन शुक्रवारी दुपारनंतरही पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विद्यार्थीदेखील शाळेत जाऊ शकले नाहीत.
कर्जाची परतफेड करायची तरी कशी?
कापूस पिकाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतानाच कर्जाची परतफेड करू, असा विचार करणारा शेतकरी आता हतबल झाला आहे.

Web Title: Threads on the heights of thousands of hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.