विविध मुद्यांवरून गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:38 PM2018-01-31T23:38:20+5:302018-01-31T23:38:44+5:30
डम्पींग यार्डमधील कचरा प्रक्रियेसाठी अंबुजा कंपनीला देणे, पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात नगरोत्थानचा निधी देणे आणि मूल मार्गाला जोडणाऱ्या बायपास रोडला मंजुरी देणे, या तीन विषयांवरून मनपाच्या बुधवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : डम्पींग यार्डमधील कचरा प्रक्रियेसाठी अंबुजा कंपनीला देणे, पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात नगरोत्थानचा निधी देणे आणि मूल मार्गाला जोडणाऱ्या बायपास रोडला मंजुरी देणे, या तीन विषयांवरून मनपाच्या बुधवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. नगरसेवकांनी सभागृहासमोर प्रश्नांची सरबत्ती करून सभागृह दणाणून सोडले.
महानगरपालिकेची आमसभा बुधवारी मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महापौर आणि आयुक्त विदेशवारीवर असल्यामुळे ही आमसभा उपमहापौर अनिल फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या आमसभेत अंबुजा सिमेंट कंपनीला कम्पोस्ट डेपोतील कचरा देण्याचा विषय अजेंड्यावर होता. शहर विकास आघाडीचे गटनेते व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या संदर्भात एक पत्र महापौरच्या नावे लिहिले होते.
अंबुजामध्ये प्लॉस्टिक व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी, असा ठराव उपरवाही ग्रामसभेत घेण्यात आला होता.
या ठरावाची प्रत देशमुख यांनी महापौर यांना दिलेल्या तक्रारीसोबत जोडलेली होती. या तक्रारीच्या प्रत देशमुख यांनी सर्व नगरसेवकांना देऊन सहकार्य करण्याची विनंतीसुध्दा केली होती. त्यानुसार आजच्या आमसभेत या विषयाला तीव्र विरोध करण्यात आला.
सध्या मनपाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या बाबतीत बेजबाबदारपणे काम करणाºया व गोरगरीब ग्रामीण लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाºया कंपनीला प्रक्रिया करण्यासाठी कचरा देणे योग्य नाही, अशी भूमिका पप्पु देशमुख यांनी मांडली. त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे अंबुजाला कचरा देण्याचा ठराव रद्द करण्यात आला.
निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा गाजला
नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मनपाला निधी मिळाला. मात्र मनपा पदाधिकाºयांनी हा निधी आपल्याच प्रभागात देऊन इतर प्रभागाला ठेंगा दाखविला. यावरून मागील अनेक दिवसांपासून मनपाच्या नगरसेवकांमध्ये वादविवाद सुरू आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकही यामुळे नाराज आहे. आमसभेत यावरून उफाळलेला असंतोष सभागृहासमोर आला. काँग्रेस, बसपा, भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी डायससमोर येऊन याबाबत सभागृहाला जाब विचारला. याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने चांगलाच गदारोळ झाला.
दत्तनगरला नगरोत्थानमधून डावलल्याचा निषेध
वडगाव प्रभागातील दत्त नगरमध्ये ९०० च्या वर लोकसंख्या आहे. याठिकाणी मागील २० वर्षांपासून रस्ते, नाल्या अशी विकासकामे झालेली नाहीत. २०१७-१८ या वर्षासाठी आलेल्या नगरोत्थान निधीमधूनही दत्त नगरला वगळण्यात आले. याचा नगरसेवक देशमुख यांनी याबाबत सभागृहात निषेध केला.
रिंग रोडवरूनही वाद
तुकूम परिसरातून मूल मार्गाला जोडणाऱ्या रिंग रोडला मंजुरी देण्याचा विषय चर्चेसाठी आला. या रोडमुळे सहाशे ते सातशे घरांना हटवावे लागणार म्हणून नगरसेवक सुभाष कोसनगोट्टूवार यांनी याला विरोध दर्शविला. हा रोड महेशनगर रेल्वे लाईन ते विधी महाविद्यालयपर्यंतचा भाग वगळून करण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र भविष्यात या रिंगरोडची गरज आहेच. त्यामुळे यावर उपाययोजना करीत रोडला मंजुरी द्यावी, असे काही नगरसेवकांचे म्हणणे होते. प्रसंगी उड्डाणपूल बांधावा, असेही काहींनी सूचविले. अखेर एकही घर बाधित न होता सदर रिंग रोड बनविण्यास मंजुरी द्यावी, असा ठराव पारित करण्यात आला.