चंद्रपुरातील तीन हौशी सायकलस्वारांनी घातली ३०० किलोमीटरला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 12:38 PM2021-12-22T12:38:52+5:302021-12-22T12:46:25+5:30
चंद्रपूरच्या तीन सायकलस्वारांनी ३०० किलोमीटरचे अंतर नियोजित २० तासांमध्ये पूर्ण केले. शनिवारी पहाटे ५.३० वाजता नागपुरातील झिरो माईल स्टोन येथून या ३०० किलोमीटरच्या ब्रेव्हसाठी सायकलस्वार चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले.
चंद्रपूर : हवामान आणि भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता शरीरासोबतच मनाची कसोटी पणाला लावणारा लांब पल्ल्ल्याचा साहसी सायकलिंग प्रकार अर्थात ब्रेव्ह झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याने रविवारी एक विक्रम आपल्या नावावर नोंदविला. जिल्ह्यातील तीन सायकलस्वारांनी ३०० किलोमीटरच्या अंतराला गवसणी घालत हे दिव्य पेलले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सुनील जुनघरे, अब्दुल आबिद कुरेशी आणि पीयूष कोटकर या तिघांनी ३०० किलोमीटरचे अंतर नियोजित २० तासांमध्ये पूर्ण केले. शनिवारी पहाटे ५.३० वाजता नागपुरातील झिरो माईल स्टोन येथून या ३०० किलोमीटरच्या ब्रेव्हसाठी सायकलस्वार चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. सायकलस्वारांना चंद्रपूरपर्यंत पोहोचून परत नागपूरला जाण्यासाठी २० तासांचा कालावधी देण्यात आला होता. त्यासाठी ३७ साहसी सायकलस्वारांनी नोंदणी केली होती. एक सायकलस्वार वगळला तर यात सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व ३६ सायकलस्वारांनी या ३०० किलोमीटर अंतराला गवसणी घातली.
या ब्रेव्हेसाठी विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, वरूडसह मध्य प्रदेशातील जबलपूर व कर्नाटकातील बंगळुरू येथूनही साहसी सायकलस्वार सहभागी झाले होते. हे ३०० किलोमीटरच्या अंतराचे साहस पूर्ण करणाऱ्यांमध्ये नागपुरातील स्वाती, अजय कुलकर्णी, ॲनी विल्किन्सन, अमरावती जिल्ह्यातील अमिता, श्रीराम देशपांडे, राधा राजा, अंजली देशमुख, अतुल कळमकर, आदित्य उपासे. पीयूष खंडेलवाल, आदित्य लोखंडे, पराग भोंडे, बंगळुरूचे चेतन घोरपडे. जबलपूरचे मौसम पालेवार, मौदाचे लीलाधर ठवकर, प्रशांत चंदनखेडे, यवतमाळचे लियाकत हुसेन, नरेंद्र पहाडे यांचा समावेश होता. योगेश दापूरकर, अनिरुद्ध कुलकर्णी, मंगेश पहाडे यांनी सायकलस्वारांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. सायकलस्वारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून विकास पात्रा व अमोल रामटेके यांनी व्यवस्थापन केले.