चंद्रपुरात बनावट एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या तिघांना अटक; मुख्य सूत्रधार दिल्लीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 09:39 AM2017-12-06T09:39:40+5:302017-12-06T09:41:07+5:30
बनावट एटीएम कार्डने दिल्ली व गुडगाव येथून लाखो रुपये लंपास करणाऱ्या तिघांना चंद्रपूर सायबर गुन्हे विभागातील पोलिसांनी चंदीगड येथून अटक केली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चोरट्यांनी जिल्ह्यातील नऊ व्यक्तींच्या एटीएममधून १३ लाख ७९ हजार रुपये लंपास केले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यातील मुख्य सूत्रधार दिल्ली येथील रहिवासी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील दोन महिन्यांपासून दिल्ली व गुडगाव येथील काही व्यक्तींनी एटीएममधून पैसे काढल्याच्या तक्रारी वरोरा, रामनगर, व राजुरा पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या होत्या. याप्रकरणाची सायबर विभागाने कसून चौकशी केली. दरम्यान, १६ अंकी क्रमांक चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी वरोरा येथून अटक केली. अधिक चौकशी केली असता, मुख्य आरोपी दिल्ली येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यामुळे चंद्रपुरातील सायबर गुन्हे विभागाचे विशेष पथक लगेच दिल्ली येथे रवाना झाले. मात्र आरोपीला कुणकुण लागताच तो दिल्ली येथून चंदीगडला फरार झाला. दरम्यान चंदीगड येथील एका हॉटेलमधून मुख्य आरोपीला अटक केली. या गुन्ह्यात अन्य एक साथीदार सहभागी असल्याचे सांगितल्याने त्यालाही दिल्ली रेल्वे स्थानकावरुन जेरबंद केले. मुख्य आरोपी हा ओडिसा राज्यातील मलकानगिरी, तर दुसरा आरोपी बिहारमधील नोनी गया येथील आहे. तिन्ही आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे उपस्थित होते.
आरोपीवर विविध गुन्हे
या प्रकरणातील मुख्य आरोपीने आपल्या अन्य साथीदारांंना प्रशिक्षण देऊन ठिकठिकाणी पाठविले होते. हे आरोपी अत्यंत हुशारीने एटीएम कार्ड आणि पीन क्रमांकाची चोरी करायचे. या सर्व प्रकाराची इत्थंभूत माहिती दिल्लीतील मुख्य आरोपीला दिली जात होती. त्यानंतर बनावट एटीएम कार्ड तयार करुन त्याद्वारे रक्कम लंपास करणे सुरू होते. मुख्य आरोपीविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची माहितीही पोलीस तपासातून पुढे आली आहे.
विदर्भातून २०० एटीएमधारकांचा चोरला डेटा
अमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणात अमरावती पोलिसांनी एकास, तर चंद्रपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चंद्रपुरातील तीन आरोपींना अमरावती पोलीस प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेणार आहे. बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील चार आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. यातील हरीश बिस्वास, विशाल उमरे व आलोक नावाच्या आरोपीस चंद्रपूर पोलिसांनी, तर परितोष पोतदारला अमरावती पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. या चौघांची पोलीस कोठडीत चौकशी सुुरू आहे. परितोष पोतदार व विशाल उमरे हे दोघेही खातेदारांचा डेटा चोरण्यासाठी अमरावतीत आले होते. या दोघांनी अमरावतीतील ५० ते ६० जणांचे एटीएम क्रमांक व पासवर्ड दिल्लीत बसलेला बॉस बिस्वासकडे पाठविले होते, तर विदर्भातील विविध शहरातील खातेदारांचा डेटा पाठविल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.