तीन म्हशींचा रेल्वेखाली येऊन मृत्यू
By admin | Published: May 29, 2016 01:11 AM2016-05-29T01:11:59+5:302016-05-29T01:11:59+5:30
चंद्रपूरवरुन सकाळी १० वाजता गोंदियाकडे निघणाऱ्या रेल्वे गाडीच्या खाली केळझर-टोलेवाहीदरम्यान रेल्वे रुळ ओलडताना तीन म्हशी आल्या.
वाहतूक ठप्प : सुदैवाने हजारो प्रवासी बचावले
ब्रह्मपुरी : चंद्रपूरवरुन सकाळी १० वाजता गोंदियाकडे निघणाऱ्या रेल्वे गाडीच्या खाली केळझर-टोलेवाहीदरम्यान रेल्वे रुळ ओलडताना तीन म्हशी आल्या. यात या म्हशींचा मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात रेल्वेला काहीही झाले नाही आणि प्रवासी बचावले.
यापैकी एका म्हशीचे धड व तोंड रेल्वे इंजीनमध्ये विचित्र पध्दतीने फसल्यामुळे इंजिन निकामी झाले. गोंदियाकडे जाणाऱ्या गाडीचा प्रवास ठप्प झाला. अपघात एवढा विचित्र होता की तिन्ही म्हशीला तब्बल ३०० फूट गाडीने समोर ओढत नेले. त्यापैकी एका म्हशीने अपघातातच पिलाला जन्म दिला, पण त्याचाही मृत्यू झाला. या तीनपैकी दोन म्हशी रुळाबाहेर फेकल्या गेल्या. परंतु एक म्हैस मात्र रेल्वेच्या चाकात विचित्र प्रकारे फसली. तिला काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.
यानंतर गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणारी रेल्वे गाडी मुल येथे पोहोचल्यानंतर तिचे इंजीन घटना स्थळावर नेण्यात आले व अपघातग्रस्त रेल्वेगाडीला मूल येथे आणण्यात आले.
त्यानंतर बल्लारशावरुन इंजीन आले, तेव्हा गाडीला सरळ गोंदियाकडे नेण्यात आले.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर अनेक तास ही रेल्वे जागेवर थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. जवळपास मोठे स्टेशन नसल्याने त्यांना रेल्वेत बसूनच पुढच्या प्रवासाची प्रतीक्षा करावी लागली. ब्रह्मपुरीला दुपारी १ वाजता पोहचणारी रेल्वे तब्बल सायंकाळी ५ वाजता ब्रह्मपुरीला पोहोचली. सुदैवाने ३०० फूट म्हशींना ओढत नेले तरी रेल्वे रुळावरुन घसरली नाही. अन्यथा हजारो प्रवाशांचा यात घात झाला असता. (तालुका प्रतिनिधी)