डॉक्टरांचे प्रयत्न, "दिव्यांगी"ला मिळाले जीवनदान; जहाल मण्यार सापाचे अंगात पसरलेचे विष यशस्वीरित्या बाहेर काढले
By राजेश भोजेकर | Published: November 3, 2023 03:55 PM2023-11-03T15:55:12+5:302023-11-03T16:05:21+5:30
सापाचे विष मुलींच्या अंगभर पसरल्याने प्रकृती अधिकच गंभीर झाली होती
चंद्रपूर : झोपण्यासाठी गेलेल्या दिव्यांगी उमरे (१४) या मुलींच्या बोटाला ब्लॅकेटमध्ये असलेल्या भल्या मोठ्या जहाल विषारी मण्यांर सापाने चावा घेतल्या. गंभीर अवस्थेत मुलींला बेंदले रूग्णालयात दाखल करण्यात आले. सापाचे विष मुलींच्या अंगभर पसरल्याने प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. मुलीला दोन दिवस कृत्रीम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. डॉ. आनंद बेंदले, डॉ. सुनिल दिक्षीत व हदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर या तीन डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत दोन दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर मुलींचा जीव वाचविण्यात यश आले. भूलतज्ज्ञ , ऱ्हदयरोगतज्ज्ञ हे तीन डॉक्टर दिव्यांगी हिचेसाठी देवदूत ठरले.
बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील दिव्यांगी उमरे ही १४ वर्षीय मुलगी घरी झोपण्यासाठी गेली असता, ब्लॅकेटमध्ये भला मोठा जहाल विषारी मण्यांर साप होता. दिव्यांगीने ब्लॅकेट अंगावर घेताच सापाने तिच्या हाताच्या बोटाला चावा घेतला. चावा घेताच मुलीने आरडा-ओरड केल्याने ही बाब कुटूंबियांच्या लक्षात आली. कुटूंबियांनी लगेच तिला स्थानिक डॉ. आनंद बेंडले यांच्या रूग्णालयात दाखल केले. दाखल करतेवेळी प्रकृती ठणठणीत होती. मण्यांर या जहाल विषारी सापाने तिच्या बोटाला चावा घेतल्यामुळे रक्तप्रवाहाव्दारे संपूर्ण शरीरभर विष पसरले होते. त्यामुळे ती काही वेळानंतर बेशुद्ध पडली.
डॉ. बेंडले यांनी क्षणाचाही विलंब न करतांना मुलींला अतिदक्षता विभागात दाखल करून कृत्रीम श्वसन पध्दती व व्हेंटीलेटरवर मुलींला ठेवले. संपूर्ण शरीरात विष पसरल्याने मुलींचे कुटूंबिय चिंतेत होते. डॉ. बेंदले यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. सुनिल दिक्षीत, हदयरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर यांनी मुलींवर दोन दिवस शर्थीचे प्रयत्न करीत उपचार केले. यावेळी दिव्यांगी हिला एकाच वेळी १०० एन्टी स्नेक इंजेक्शन लावण्यात आले.
मेडीकल मध्ये केवळ ३५ इंजेक्शन उपलब्ध होते. मात्र तिरूपती मेडीकोजचे सतिश निंबाळकर यांनी धावपळ करून ५० इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून दिले. त्यानंतर मुलींच्या शरीरातील संपूर्ण विष काढण्यात आले. त्यानंतर मुलींने उपचाराला प्रतिसाद देण्यास सुरूवात केली. दोन दिवसानंतर मुलींची प्रकृती पूर्वपदावर येत असून अतिदक्षता विभागातून तिला सामान्य वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. मुलींची प्रकृती ठणठणीत झाली असून दिव्यांगी आता फिरायला लागली आहे. मुलींवर शर्थीचे प्रयत्न करून डॉ. आनंद बेंडले, भूलतज्ज्ञ डॉ. सुनिल दिक्षीत, हदयरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर यांनी यशस्वी उपचार करून मुलींचे जीव वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.